संपूर्ण जगात आपल्‍या भारताची ओळख 'कृषीप्रधान देश' म्‍हणून परिचित आहे. दुर्दैव म्‍हणजे या देशात सर्वाधिक आत्‍महत्‍या करणारे कृषी पुत्रच आहे. आजपर्यंत देशात लाखो कर्जबाजारी शेतक-यांनी आत्‍महत्‍या केलेल्‍या आहेत व आजही करीतच आहेत. परंतू सरकार हे दुष्‍टचक्र थांबवू शकत नाही. वैफल्‍यग्रस्‍त, उदासीन शेतकरी कुणाचे काही एक ऐकत नाही. समाजाचा प्रत्‍येक घटक शेतक-यांपुढे हतबल झालेला आहे. या क्षणी गरज आहे ती अशा मार्गदर्शकाची की त्‍याच्‍या प्रबोधनामुळे तरी शेतकरी आत्‍महत्‍या पासून परावृत्‍त होतील. जवळपास शेतकरी वर्ग हा वारकरी संप्रदायाशी निगडीत आहे व त्‍यांचे आराध्‍य दैवत म्‍हणजे पंढरीचा विठोबा...
    विश्‍वास गमावून बसलेला हा शेतकरी जेव्‍हा कुणाचं काही ऐकणार नाही, तेंव्‍हा तो आपल्‍या लाडक्‍या विठोबाचं नक्‍की ऐकेल, हाच धागा पकडून साईलक्ष्‍मी प्रॉडक्‍शन र्नि‍मित व कैलाश माळी दिग्‍दर्शित चित्रपट 'तिफन.... एक किंचाळी' शुक्रवार दि. 17 मे रोजी संपूर्ण महाराष्‍ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील नायकाला जीवंतपणीच, त्‍याच्‍या आत्‍महत्‍येनंतरचे दुष्‍परिणाम पहायला मिळतात व तो आत्‍महत्‍येपासून परावृत्‍त होतो.
    अनिकेत केळकर व प्राजक्‍ता केळकर ही लाईफ जोडी 'तिफन' चित्रपटामध्‍ये पती-पत्‍नीच्‍या भूमिकेत असून सोबत डॉ. विलास उजवणे, रवी सावंत, शिवाजी शिंदे, कैलास चव्‍हाण, सादिक शेख, विद्या रजपूत यांच्‍या प्रमुख भूमिका आहेत. डॉ. पुरुषोत्‍तम भापकर, बाबा सौदागर यांच्‍या गीताना रवी खरात व अतुल दिवे यांनी संगीत दिले आहे. तर सुरेश वाडकर, नेहा राजपाल, स्‍वप्‍नील बांदोडकर यांनी खरं साज चढविला आहे.
    चित्रपटाचा फर्स्‍ट लुकचा अनावरण राज्‍याचे गृहमंत्री ना. आर.आर. पाटील यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले असून दि. 17 मे पासून 'तिफन... एक किंचाळी' हा चित्रपट महाराष्‍ट्रभर प्रदर्शित होत आहे.
 
Top