दुष्काळ ग्रस्तांसाठीच्या पैशावर कॉंग्रेस आय पक्षाचा प्रचार सुरु
असल्याची धक्कादायक बाब उस्मानाबाद जिल्ह्यात समोर आली आहे. सरकारी
अनुदानावर सुरु असलेल्या गुरांच्या चारा छावणी मध्ये, शेतक-यांच्या
प्रत्येक गोठ्यावर, झोपडीवर काँग्रसचे शेकडो झेंडे लावण्यात आले आहेत.
प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या ६ मे रोजी झालेल्या पहाणी दौ-यादरम्यान ही बाब समोर आली आहे. दुष्काळग्रस्तांच्या जीवावर, सुरु असलेल्या
कॉंग्रेसच्या या प्रचार संधीचा सर्व थरातून निषेध होत आहे. मात्र चारा
छावणीला भेट देण्यासाठी आलेले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे
यांना मात्र, छावणी वरील झेंडेगिरीचे समर्थन करताना शब्द सापडत
नव्हते. उस्मानाबाद जिल्ह्यातील
हडोंग्री येथे कॉंग्रेसचे बाळासाहेब पाटील यांनी शासकीय
अनुदानावर गुरांसाठी चारा छावणी सुरु केली आहे. यां छावणी मध्ये परिसरातील
शेतक-यांची सुमारे ६ हजार जनावरे आहेत. दुष्काळग्रस्त भागातील या चारा
छावणीला भेट देण्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे आले
होते. त्यावेळी या छावणीतील प्रत्येक गोठ्यावर कॉंग्रेसचे झेंडे मोठ्या
प्रमाणात लावण्यात आले होते. ही गुरांची छावणी आहे कि कॉंग्रेसचा मेळावा
अशी शंका पाहणा-यांना येत होती. जेंव्हा झी मिडिया चा कॅमेरा हे
सर्व टिपत असल्याचे लक्षात येताच कॉंग्रेस कार्यकर्त्यांची मात्र पळापळ
सुरु झाली. काही झेंडे काढूनही टाकण्यात आले पण झेंड्यांची संख्या जास्त
असल्यामुळे कार्यकर्त्यांचीही पंचायत झाली. दुष्काळाच्या झळा सोसणा-या
शेतक-यांसाठी आलेला सरकारी निधीतून, चारा छावणी सुरु असल्याचे भानही,
उत्साही कॉंग्रेस कार्यकर्ते हरवून बसले आहेत. येणा-या विधानसभा
निवडणुकीचा उद्देश समोर ठेवूनसुरु केलेल्या, या संवेदनाशून्य प्रकारचा
पर्दाफाश झाल्याने अनेक राजकीय
नेते मंडळीचे धाबे दणाणले आहेत. दुष्काळग्रस्तांच्या जीवावर सुरु
असलेल्या कॉंग्रेसच्या या प्रचार संधीचा सर्व थरातून निषेध होत आहे.