सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणाजवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. नोव्हेंबर २५, इ.स. १६६४ रोजी याचे बांधकाम आरंभले. शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या ५२ व ४५ दगडी जिने आहेत. ह्या किल्ल्यावर शिवकालिन ३ गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत. त्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर अशी आहेत .या किल्ल्यामध्ये महाराष्‍ट्रातील एकमेव शिवाजी महाराजांचे शंकराच्या रुपातील मंदीर आहे. याची स्थापना ‍राजाराम महाराजांनी केली आहे.
      मालवण समुद्र किना-यापासून काही अंतरावर भर समुद्रात असलेल्‍या सिंधुदुर्ग किल्‍ला हा देश-विदेशातील पर्यटकांकासाठी आकर्षणाचे केंद्र आहे. शिवाजी महाराज यांनी समुद्रातील एका बेटावर बांधलेला हा किल्‍ला महाराजांच्‍या दूरदर्शी विचारांचे प्रतीक आहे. परकीय शत्रूंचे समुद्रावरील वर्चस्‍व कमी व्‍हावे व आपले नाविक दल मजबूत व्‍हावे, म्‍हणून शिवाजी महाराजांनी हा किल्‍ला बांधण्‍याचा आदेश दिला. 25 नोव्‍हेंबर 1664 साली या किल्‍ल्‍याच्‍या बांधकामास सुरुवात झाली व सुमारे तीन वर्षानंतर किल्‍ल्‍याचे बांधकाम पूर्ण झाले. खडक फोडून त्‍यात हजारो किलो शिसे व लोखंडे ओतून किल्‍ल्‍याचा पाया मजबूत करण्‍यात आला. 48 एकर म्‍हणजेच सुमारे 1 लाख 90 हजार चौरस मीटर परिसरात हा किल्‍ला पसरलेला असून तीन किलोमीटर लांबीची संरक्षक भिंत किल्‍ल्‍याला वेढून आहे. ही भिंत 30 फूट उंच असून 12 फूट रुंद आहे. एवढी मोठी संरक्षक भिंत उभारण्‍याचे कारण म्‍हणजे शत्रू सैन्‍याचा हल्‍ला व अजस्‍त्र समुद्री लाटा यापासून किल्‍ल्‍याचे रक्षण व्‍हावे. या किल्‍ल्‍याचे प्रवेशद्वार शत्रूला बाहेरुन सहजपणे दिसणार नाही, अशा पध्‍दतीने बनवण्‍यात आले आहे.
   
मालवण किल्‍ल्‍याच्‍या मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती
  किल्‍ल्‍यात अनेक महत्‍त्‍वाची ठिकाणे आहेत. ज्‍यात प्रमुख आहे शिवाजी महाराजांचे एकमेव मंदीर. हे मंदिर राजाराम महाराज यांनी बांधले. येथे शिवजयंती उत्‍सव मोठ्याप्रमाणात साजरा होतो. किल्‍ल्‍यामध्‍ये तीन गोड्या पाण्‍याच्‍या विहीरी असून उन्‍हाळ्यात देखील या विहिरी भरलेल्‍या असतात. शिवाजी महाराजांच्‍या एका हाताचा व एका पायाचा ठसा येथे पहायला मिळतो. आत्‍मेश्‍वर मंदिर हे भगवान शंकराचे प्रसिध्‍द मंदीर येथेच आहे.
    या किल्‍ल्‍यात पूर्वी नारळाचे एक विचित्र झाड होते. ज्‍याला एक फांदी होती. मात्र, काही वर्षापूर्वी हे झाड वीज पडल्‍याने जळून गेले. किल्‍ल्‍याच्‍या जवळ स्‍कुबा डायव्हिंग व स्‍नार्केलिंग करण्‍याची सुविधा आहे. किल्‍ल्‍यामध्‍ये लोकांची वस्‍ती असून सुमारे 15 कुटुंबीय वस्‍ती करुन राहत आहेत. येथील समुद्र प्रवाळांनी भरलेला आहे. शिवप्रेमी व इतिहासप्रेमी नागरिकांनी एकदा अवश्‍य या किल्‍ल्‍यास भेट द्यावे.  

     अधिक माहितीसाठी श्री संजय राठोड (गाइड, मालवण, मो. 9404396188) यांच्‍याशी संपर्क साधावे.
 
Top