उस्‍मानाबाद -: राज्यात एकीकडे दुष्काळ निधीतील भ्रष्टाचार, चारा छावणी आणि टँकर लॉबीचा भ्रष्टाचार दररोज उघड होत आहे. तर दुसरीकडे स्वतःचे लाखो रुपये खर्च करून निस्वार्थ भावनेने पाणी पुरवठा करणारेही समोर येत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी गावचे उद्योजक सुभाष देशमुख यांनी गावासाठी दररोज साडे चार लाख लिटर पाणी मोफत वाटप करून नवा आदर्श निर्माण केला आहे.
    उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी गावाला दुष्काळी परिस्थितीचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी सर्व स्‍त्रोत केंव्हाच आटून गेली आहेत. पण या गावाचे उद्योजक सुभाष देशमुख यांनी गावाला पाणी टंचाई जाणवू दिली नाही. २० किलोमीटर अंतरावरील स्वताच्या शेतातातील पाणी स्वताच्याच ३ टँकर मधून दररोज आणून नागरिकांना मोफत वाटप केले आहे. दररोज ४ ते साडेचार लाख लिटर पाणी आणून ते नागरिकांना वाटप करतात.
    गावोगावी सुभाष देशमुख यांच्यासारखा विचार आणि कृती करणारी माणसे निर्माण झाली तर सामान्य नागरिकांना दुष्काळाचा फटका कमी प्रमाणात बसून भ्रष्टाचारावर काही प्रमाणात का होईना नियंत्रण मिळवता येवू शकते. गरज आहे ती आर्थिक हव्यास कमी करून सामजिक कर्तव्य निभावण्याची...
# महेश पोतदार 
zee 24 taas,उस्मानाबाद
 
Top