उस्मानाबाद -: सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी तालुकास्तरावरील समित्यांच्या नियमित बैठका होतील हे पाहावे तसेच दरमहा होणारे धान्यवाटप नियतन तपासून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी पुरवठा विभागाला दिल्या.
      जिल्हा सार्वजनिक वितरण व्यवस्था  दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी घेतली. यावेळा त्यांनी जिल्ह्यात असणारी एकूण कार्डधारकांचा संख्या, त्याअंतर्गत असणारी एपीएल, बी.पी.एल., अंत्योदय, अन्नपूर्णा तसेच पांढ-या कार्डधारकांची संख्या, त्यांना केला जाणारा अन्नधान्य पुरवठा, केरोसीन वाटप, जिल्ह्यातील शासकीय व खासगी गोदामांची संख्या व त्यांची स्थिती आदींची माहिती घेतली.
      रेशन कार्ड दुकानदारांना केले जाणारे धान्य वाटप आणि त्यांच्याकडून लाभार्थ्यांना केला जाणारा पुरवठा नियमित होतो का, हे जिल्हास्तरीय समिती सदस्यांनी तपासावे, गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्याला साखर कारखान्यांकडून कमी साखरेचा पुरवठा होत आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी या कारखाना प्रशासनाशी संपर्क साधून साखर नियमित मिळण्याबाबत पाठपुरावा करावा, असे निर्देश डॉ. नागरगोजे यांनी दिले.
     या बैठकीला अपर जिल्हाधिकारी ज्ञानोबा फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी राम मिरासे यांच्यासह अशासकीय सदस्य उपस्थित होते.
 
Top