उस्मानाबाद :- टंचाई परिस्थितीत जिल्हा प्रशासनामार्फत  केल्या जात असलेल्या उपाय योजनांसंदर्भात आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालक सचिव तथा पशुसंवर्धन विभागाचे सचिव अनिल डिग्गीकर यांनी आढावा घेतला. टंचाई संदर्भात राज्यस्तरावर प्रलंबित विषयांची माहिती घेवून त्यावर  लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
    जिल्हाधिकारी डॉ.के.एम. नागरगोजे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास,जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हजारे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संतोष राऊत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, नागरी विकास प्रकल्प यंत्रणेचे संचालक श्री. कुरवलकर, जिल्हा नियेाजन अधिकारी एम.के. भांगे, वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रमोद रेड्डी, उस्मानाबाद नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय चारठाणकर, उस्मानाबाद पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. बी. कोटे, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. तांगडे  आदिंची उपस्थिती होती.
      यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी जिल्ह्यात सुरु असणाञया टंचाई उपाय योजनांची माहिती डिग्गीकर यांना दिली. नळ पाणी पुरवठा योजना, विहीर-विंधनविहीर अधिग्रहण, कृषी विभागामार्फत केल्या जात असणा-या उपाय योजनांचीही माहिती डिग्गीकर यांनी यावेळी घेतली.   
 
Top