उस्मानाबाद :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी लिपीक टंकलेखक (मराठी व इंग्रजी) या पदासाठीची परीक्षा रविवार, दि.2 जून,2013 रोजी होत आहे. रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, उस्मानाबाद पार्ट‍ (ए), रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, उस्मानाबाद पार्ट (बी), जिल्हा परिषद (कन्या प्रशाला), तेरणा महाविद्यालय आणि अभिनव इंग्लिश स्कूल, भानूनगर, उस्मानाबाद या परीक्षा केंद्रांवर ही  परीक्षा होत असून परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी संजय गायकवाड यांनी कळविले आहे.
    या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात घोषणा देण्यास, परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय या परिसरातील झेरॉक्स सेंटर्स , पानपट्टी, टायपींग सेंटर, एस.टी.डी.बुथ, ध्वनीक्षेपक, कॉम्पूटर सेंटर्स तसेच इंटरनेट कॅफे बंद राहतील. परीक्षा केंद्र परिसरात मोबाईल, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर कोणत्याही वाहनास प्रतिबंध असेल. केवळ संबंधित परीक्षा केंद्रांवर नेमणूक केलेले अधिकारी/ कर्मचारी , शासकीय कामावरील अधिकारी व कर्मचारी, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि उमेदवारांनाच परीक्षा केंद्रांवर प्रवेश असेल.
 
Top