उस्मानाबाद -: जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात असणा-या अनधिकृत व बहुमजली धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करुन त्यांच्यावर नियमाप्रमाणे तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी आज सर्व नगरपालिकांना दिल्या.
        येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज सर्व नगरपालिकांचे अध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांची डॉ नागरगोजे यांनी बैठक घेऊन या सूचना दिल्या.
       कायदा व सुव्यवस्थेचा आग्रह सर्वांनीच धरला पाहिजे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी अनधिकृत बांधकाम केलेल्या बांधकाम व्यावसायिक आणि विकासक यांच्यावर एमआरटीपी कायद्यांतर्गत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी नगरपालिकांनी त्यांना दिलेल्या सर्व अधिकारांचा वापर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. नगरपालिका क्षेत्रात विशिष्ट क्षेत्रासाठी पदनिर्देशित अधिकारी, बीट फीसरची नेमणूक, अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी नगरपालिकांचा ठराव, संबंधितांना नोटीसा देण्याची कार्यवाही याबाबत सर्वांकडून कार्यवाही होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
      अनधिकृत बांधकामांसदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेतल्यानंतर डॉ. नागरगोजे यांनी सर्व नगरपालिकांना घनकचरा व्यवस्थापनाबाबत गांभीर्याने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. पर्यावरण विषयक कायदे अतिशय कडक आहेत. त्यामुळे सर्व नगरपालिकांनी सांडपाणी व्यवस्थापन, नगरपालिका क्षेत्रात दैनंदिन कचरा संकलन, ओला व सुका कचरा संकलानावेळीच वेगळा करणे, कचऱ्यावर प्रकिया करणारे प्रकल्प कार्यानिवत करणे आदींबाबत कार्यवाही करण्याचे सूचित केले.
     जिल्हा नागरी विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक कुरवलकर यांनी  नगरपालिकांनी विविध योजनांसंदर्भात केलेल्या उद्दिष्ट्यपूर्तीचा आढावा घेतला. आठही नगरपालिकांचे अध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.
 
Top