उस्मानाबाद -: उजनी पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा शनिवारी दि.11 मे दुपारी तीन वाजता येथील नगरपरिषदेच्‍या प्रागंणात आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री ना. पृथ्‍वीराज चव्‍हाण,  उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या हस्ते पाण्याचा लोकार्पण कार्यक्रम सोहळा संपन्‍न होणार आहे.
     बहुप्रतिक्षित उजनी पाणीपुरवठा ऐन दुष्काळात पूर्ण झाल्यामुळे शहराला समाधानकारक पाणीपुरवठा होऊ लागला आहे. पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतरच कार्यक्रमाचे नियोजन करा, अशा सूचना खुद्द मुख्यमंत्र्यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिल्या होत्या. लोकार्पण कार्यक्रमास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे, नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव, पालकमंत्री मधुकर चव्हाण, खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, आमदार बसवराज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीं उपस्थित राहणार आहेत. मान्यवरांची वेळ निश्चित होताच पालिकेचे मुख्याधिकारी अजय चारठणकर यांच्यासह पदाधिकार्‍यांनी नगरपालिकेसमोरील नाट्यगृहाच्या मैदानाची पाहणी केली. त्यानंतर सभामंडप उभारणीची तयारी सुरू झाली. शहरातील नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष अमित शिंदे यांनी केले आहे. दरम्यान, काही भागात विस्कळीत असलेला पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या जिल्हा प्रशासनाने सूचना दिल्या असून, पालिकेची यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामुळे काही भागात तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे
 
Top