
दि. 13 मे पासून उस्मानाबाद पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर 106 पोलीस शिपाई पदासाठी पोलीस भरती सुरु होत असून यासाठी उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी एकूण 6 हजार 72 उमेदवारांनी पत्र भरलेले आहेत. यामध्ये 5 हजार 938 पुरुष व 764 महिला उमेदवारांचा समावेश आहे. आवेदन पत्र भरलेल्या उमेदवारापैकी दररोज 750 उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी बोलविण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांनी आपल्या प्रोफाईल वरुन कागदपत्र पडताळणी व शारीरिक चाचणीचा दिनांक व वेळ याची नियमितपणे खात्री करावी.
या पोलीस भरतीच्या वेळी समाजातील काही दलाल अगर तत्सम व्यक्ती उमेदवारांना भरतीचे खोटे आमिष दाखवून पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्याशी आमची ओळख आहे, असे गरजू उमेदवारांना भासवून त्यांची फसवणूक करण्याची शक्यता असते. सदरची पोलीस भरती अत्यंत पारदर्शक होणार असून भरतीची प्रत्येक प्रक्रिया पारदर्शक स्वरुपाची राहणार आहे. ही भरती शासकीय नियमानुसार काटेकोरपणे होणार आहे. सदर भरतीत कोणत्याही प्रकारचे वशीलेबाजी ओळख या प्रकाराला थारा दिला जाणार आहे. यामुळे कोणत्याही उमेदवारांनी अथवा उमेदवारांच्या नातेवाईकांनी कोणत्याही आमिषाला किंवा कोणाच्याही ओळखीला बळी पडू नये.
दलांलावर पाळत ठेवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व गुप्तचर विभाग यांना सुचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच उस्मानाबाद जिल्हा पोलीस घटकातील गुप्तचर पथकेही नेमण्यात आलेली आहेत. गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितांवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, शिवाय गैरप्रकारात सामील होणा-या उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी दिला आहे.
उमेदवार किंवा त्यांच्या नातेवाईकांना कोणी भरती संदर्भात अमिष दाखवील किंवा मी काय करुन देतो, असे सांगत असेल तर अशा लोकांची माहिती पोलीस अधिक्षक (दुरध्वनी क्रमांक - 02472 -227620), अप्पर पोलीस अधिक्षक (दुरध्वनी - 02472-227020), पोलीस उपअधिक्षक (दूरध्वनी - 02472 - 227622) यांना तात्काळ माहिती द्यावी, येथे तात्काळ माहिती द्यावी.
त्याचप्रमाणे उमेदवार व त्यांच्या नातेवाईकांनी अशा प्रकारच्या अमिषापासून तसेच दलालापासून सावध राहावे, कोणी भरतीच्या कामासाठी लाचेची मागणी करीत असल्यास त्या व्यक्तीची नावासहीत पोलीस उपअधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद (दुरध्वनी - 02472 - 222879) यांना द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी केले आहे.