ताज्या घडामोडी

उस्मानाबाद -: विविध पिकाच्या आधारभूत किंमती ठरविण्यासंदर्भात  शेतक-यांच्‍या सूचना ऐकून घेण्यासाठी 15 जून रोजी लातूर येथे कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी उपसमितीची सभा आयोजित करण्यात आली आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या डी.पी.डी.सी. सभागृहात सकाळी 11 वाजता ही सभा होणार आहे.
    शेतमालाच्या किमान हमी भाव किंमती संदर्भात उत्पादन खर्च काढण्याच्या केंद्र व राज्य शासनाच्या कार्यपध्दतीचा अभ्यास करणे, त्यामधील उणीवा दूर करणे, या संदर्भात उपाय योजना सूचविणे आदि बाबींवर चर्चा तसेच जनसूनावणी यावेळी होणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या बैठकीस उपस्थित राहून आपल्या सूचना लेखी स्वरुपात कार्यकारी उपसमितीस द्याव्यात,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
    विविध पिकाच्या आधारभूत किंमती ठरविण्यासंदर्भात  केंद्रीय कृषी किंमत आयोगामार्फत केंद्र शासनास शिफारस करण्यात येते. या शिफारसी विचारात घेऊन केंद्र शासनाकडून विविध पिकांच्या आधारभूत किंमती प्रत्येक वर्षी घोषित करण्यात येतात. शेतमालाच्या पीक निहाय उत्पादन खर्चाच्या आकडेवारीबाबत राज्यातील कृषी विद्यापीठामार्फत माहिती संकलित केली जाते. या माहितीवर आधारित राज्य शासनामार्फत केंद्रीय कृषी मुल्य व किंमत आयोगाकडून विविध पिकाच्या आधारभूत किंमतीची शिफारस करण्यात येते. राज्यात कृषी मंत्र्यांच्या सूचनेनुसार कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी उपसमिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती शेतक-यांचे म्हणणे ऐकणार असून 15 जून रोजी लातूर येथे समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे.
 
Top