उस्मानाबाद -: जनतेला स्वच्छ पाणी देण्याबाबत शासन आग्रही असून कोणत्याही परिस्थितीत पावसाळी हंगामात जलजन्य आजार पसरणार नाहीत, याची काळजी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासनाने घ्यावी आणि स्वच्छ पाण्याचे महत्व जनतेला पटवून द्यावे, असे आवाहन पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांनी केले.
      जिल्हा परिषदेचा जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, पंचायत समिती,उस्मानाबाद यांच्यावतीने आज सोमवार रोजी पाणी गुणवत्ता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उदघाटन प्रसंगी पालकमंत्री चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सुभाष व्हट्टे, पंचायत समिती सभापती प्रेमलता लोखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.हरिदास, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हजारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी के.डी. बोणे, पाणी व स्वच्छता कक्षाचे जिल्हा समन्वयक डॉ. आर.आर.चंदेल, गटविकास अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
      डॉ.व्हट्टे यांनी पाण्याच्या गुणवत्तेसंदर्भात आता पाऊले उचलली पाहिजेत कारण 90 टक्के आजार हे जलजन्य आजार असतात, असे प्रतिपादन केले. हरिदास यांनी दुषीत पाण्यामुळे होणारे रोग, ते टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना तसेच या कामी महत्वाची असणारी गावपातळीवरील जलसुरक्षकाची भूमिका याबाबत विवेचन केले.
    या कार्यशाळेस मार्गदर्शन करतांना जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. तागडे यांनी पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रमात जल सुरक्षक, आरोग्य सेवक,तालुका प्रयागेशाळा, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा यांचया जबाबदारीचे शासन निर्णयान्वये विवेचन, मुख्य अणूजीव शास्त्रज्ञ एफ.एम.पठाण यांनी प्रयोगशाळांचा सहभाग व पाणी गुणवत्ता विषयक विविध चाचण्यांची माहिती दिली तर श्री. पाचांळ यांनी चाचण्यांचे प्रात्यक्षिक सादर केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रईस हाश्मी व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांचाळ यांनी जलजन्य रोगांबाबत माहिती देऊन त्यावरील उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
    या कार्यशाळेच्या प्रास्ताविकात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.आर.आर.चंदेल यांनी कार्यशाळा आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. आभार गटविकास अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रमाकांत गायकवाड यांनी केले. या कार्यशाळेस वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी, सरपंच, तालुक्याचे ग्रामसेवक, जलसुरक्षक व संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.              
 
Top