उस्मानाबाद :– बियाणे आणि खत वाटपाबाबत कोणतीही तक्रार येणार नाही याची दक्षता निर्देश पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांनी कृषी विभागाला दिले.
        जिल्ह्यातील निविष्ठा उपलब्धतेबाबत आज पालकमंत्री चव्हाण यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जि. प. अध्यक्ष डा. सुभाष व्हट्टे, जिल्हाधिकारी डा. के.एम. नागरगोजे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास, जि. प. उपाध्यक्ष संजय पाटील दूधगावकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
       पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, शेतकऱ्यांची सध्या खरीप पेरणीसाठी धावपळ सुरु आहे. अशावेळी तो अडचणीत येणार नाही. त्याला आवश्यक ते बियाणे उपलब्ध होईल यादृष्टीने नियोजन करावे. विशेषता सोयाबीन, कापूस यांच्या बियाण्यांचा तुटवडा जाणवता कामा नये. काही शेतकरी विशिष्ट बियाण्यांचा आग्रह धरत असले तरी कृषी विभागाने याबाबत जागरुकता निर्माण करुन शेतकऱ्यांना वस्तुस्थिती समजावून द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
       बांधावर खत वाटप उपक्रम चांगला असून त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. खत व बियाणे वाटपाबाबत शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचना श्री. चव्हाण यांनी कृषी विभागाला केल्या.
       कृषी आयुक्तालयाकडून जिल्ह्यासाठी करण्यात आलेला बियाण्यांचा पुरवठा, खताचे आवंठन, खरीपाचे नियोजन, गुणनियंत्रणासाठी भरारी पथकांची स्थापना आदींबाबत पालकमंत्री चव्हाण यांनी तपशीलवार माहिती घेतली. या बैठकीसाठी विविध खत कंपन्यांचे प्रतिनिधीही हजर होते. त्यांच्याकडूनही चव्हाण यांनी खत उपलब्धतेबाबत माहिती घेतली आणि कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खत पुरवठ्याची टंचाई जाणवणार नाही, याबाबत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
       शंकर तोटावार यांनी यावेळी जिल्ह्यातील खरीप हंगाम यशस्वी पार पाडण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर भरारी दक्षता पथके स्थाप करण्यात आल्याचे सांगितले. याशिवाय  कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे बियाणे विक्री करण्यात येत आहे. बियाणे व खत उपलब्धतेबाबत शेतकऱ्यांच्या माहितीसाठी शासनाने 18002334000 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन दिल्याचे त्यांनी सांगितले.
 
Top