नळदुर्ग -: ‘काळ्या मातीत मातीत तिफण चालते’ या गीताला छेद देवून यंदाच्‍या खरीप हंगामात नळदुर्ग व परिसरातील बहुतांश शेतक-यानी अत्‍याधुनिक यंत्राच्‍या सहाय्याने पेरणी केली आहे. त्‍यामुळे भविष्‍यात तिफण, तिफणीचे चाडे, शेतक-यांच्‍या कमरेला आवळलेली बी-बियाणाची ओटी (पिशवी) व तिफणीवर बळीराजाची मुठ दुर्मिळ होण्‍याची शक्‍यता शेतक-यांतून वर्तविली जात आहे. 
             खरीप हंगाम असो की रब्‍बी हंगाम असो शेतकरी पेरणीपूर्वी जमिनीची मशागत करुन पेरणीचे दिवस जवळ आले की पेरणीचे अवजारे, बी-बियाणे, खते वगैरेची जुळवाजुळ करुन ग्रामीण भगात सुतारांच्‍याया आडीवर तिफण भरुन घेण्‍याकरीता (दुरुस्‍ती) शेतकरी गर्दी करताना दिसून येतो. परंतु यंदाच्‍या खरीप हंगामाच्‍या पेरणीकरीता नळदुर्ग व परिसरातील ब-याच शेतक-यांनी ट्रॅक्‍टरच्‍या सहाय्याने पेरणी यंत्राचा उपयोग करुन पेरणी केल्‍याचे दिसून आले.
           आधुनिक तंत्रज्ञानानुसार आजघडीला शेती करण्‍यास बळीराजा प्रयत्‍न करताना दिसत आहे. पूर्वी शक्यतो लाकडी शेती अवजारे वापरणारा शेतकरी आता लोखंडी कुळव, कोळपे, तिफण, नांगर वगैरे लोखंडी शेती अवजारे वापरात आणताना दिसत आहे. नवनवीन रासायनिक खते, बी-बियाणे, किटकनाशके वगैरेंचा वापर करुन तुषार पध्‍दतीने शेतातील पिकाना पाणी देवून कमीत कमी क्षेत्रात, कमी वेळात जास्‍तीत जास्‍त उत्‍पन्‍न कसे मिळेल, यासाठी शेतकरी सातत्‍याने प्रयत्‍न करीत आहे. या धावपळीच्‍या काळात शेणखताचा वापर, शेतातील पिकाची खळ्यावरील रास, बैलाचा पाता, रास उफनेची वावडी ह्या बाबी आता शेतातून जवळपास काळबाह्य झाल्‍या आहेत. शेणखताची जागा रासायनिक खताने घेतली. खळे, खळ्यावरील रास, बैलाचा पाता, वावड याची जागा मळणी यंत्राने घेतली. चारबैली बळीराम नांगराची जागा ट्रॅक्‍टरने घेतली. तर आता पेरणी यंत्र निघाल्‍याने तिफणीची जागा पेरणी यंत्र बळकावताना दिसत आहे. यावर्षी खरीप हंगामातील पेरणी ब-याच शेतक-यांनी ट्रॅक्‍टरच्‍या मदतीने पेरणी यंत्राद्वारे केलेली आहे. कमी वेळात जास्‍त क्षेत्र पेरणी करण्‍याचे साधन उपलब्‍ध झाल्‍याने शेतक-यांनी यंत्राद्वारे पेरणी करण्‍याचे पसंत केले असल्‍याचे शेतक-यांतून बोलले जात आहे.
 
Top