उस्मानाबाद :- जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाय योजना करण्यात आल्या. विहीरी, विंधनविहीरींचे अधिग्रहण, तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना, टँकरव्दारे पाणीपुरवठा योजना, नळयोजनांची विशेष दुरुस्ती अशा माध्यमातून टंचाईवर मात करण्याचा यशस्वी प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला. याच पध्दतीने जिल्ह्यातील सोळा तलावामधील पाणी साठ्याची उपयुक्तता लक्षात घेवून तयाठिकाणी बाष्पीभवन रोधक उपाय योजना करण्यात आली. त्याचा परिणाम म्हणजे आपण किमान 35 टक्के पाण्याचे बाष्पीभवन होण्यापासून रोखू शकलो. यामुळे जिल्हा प्रशासनाने साधारणता एक कोटी 30 लाख रुपये इतक्या खर्चाची बचत केली. पाण्याची बचत झाल्याने तेवढया प्रमाणात होणारा टँकरवरील खर्च आपण वाचविण्यात यशस्वी झालो.
       ही बाष्पीभवनरोधक उपाययोजना (इव्हॅलॉक) करताना पाण्यावर फॅटी ॲसिड हे रसायन पाण्यावर टाकले जाते. त्याचा तवंग निर्माण होतो व तवंग बाष्पीभवन रोखण्याचे काम करतो. जिल्ह्यातील 16 प्रकल्पात अशा प्रकारची उपाय योजना केल्याने 36 कोटी लिटर पाण्याची बचत झाली व त्यामुळे दुष्काळात दोन महिने  पाणीपुरवठा करणे शकय झाले. आळणी व  चोराखळी प्रकल्पातील पाणी जुन 2013 अखेर पर्यंत उपलब्ध  होवू शकले. या योजनेमुळे मुरुम, वाशी, भूम, तुळजापूर ,नळदुर्ग, अणदूर या गावांना पाणी उपलब्ध करुन देता आले.
     जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता  व्ही.बी. कोटेचा व त्यांच्या सहकाऱ्यांनी  या उपाय योजनांची प्रभावी अमलबजावणी केली. 
 
Top