उस्मानाबाद :- जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त झालेल्या कामांसाठी प्रत्येक विभागाने लवकरात लवकर प्रशासकीय व तांत्रिक मान्यता प्राप्त करुन कामे मार्गी लावावीत, असे निर्देश पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दिले.
       जिल्हा नियोजन समितीची बैठक आज बुधवार रोजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या डीपीडीसी सभागृहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार सर्वश्री राहुल मोटे, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, ज्ञानराज चौगुले, राणा जगजीतसिंह पाटील आणि विक्रम काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष डॅा. सुभाष व्हट्टे, जिल्हाधिकारी डॅा. के. एम. नागरगोजे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास, जि. प. उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, नियोजन समितीचे निमंत्रित सदस्य द्वारकादास लोहिया यांची उपस्थिती होती.
       यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी क वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजनेत निकषांची पूर्तता करणाऱ्या गावांची यादी तयार करुन ती मान्यतेसाठी ठेवण्याचे व आठ दिवसात हा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले. उस्मानाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी जिल्हा परिषदेने केलेल्या ठरावासंदर्भात चर्चा करु मार्ग काढावा, ठरावातील त्रुटी दूर करा, असे सांगितले. जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्पासंदर्भातील उपयुक्ततेबाबत महाराष्ट्र राज्य उर्जा विकास अभिकरणामार्फत (मेडा) प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी नियोजन समितीने निधी देण्यासही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
         थकबाकीदार कृषी वीजपंपधारकांची वीज तोडली जात आहे. नियमित वीजबिल भरणा करणाऱ्यांनाही त्याचा फटका बसत आहे. मात्र सध्याच्या टंचाई परिस्थितीत शेतकरी अडचणीत असल्याने ही मोहिम थांबवावी, अशी मागणी सर्वच सदस्यांकडून करण्यात आली. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी एकत्रितपणे चर्चा करुन मार्ग काढण्यात येईल, असे ठरविण्यात आले. आमदार राजेनिंबाळकर, आ. पाटील, आ. चौगुले, आ. काळे,  दुधगावकर यांच्यासह विविध सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.
जिल्हा परिषदेच्या शाळांच्या बांधकामासंदर्भातही  प्रश्न चर्चिला गेला. यावर पालकमंत्री चव्हाण यांनी याप्रश्नी सर्वंकष विचारविनिमय करुन कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना संबंधितांना दिल्या.
        लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री चव्हाण यांनी संबंधितांना दिले.
     जिल्हाधिकारी डॅा. नागरगोजे यांनी जिल्हा नियोजन आराखड्याचा तपशील सादर केला. जिल्हा नियोजन अधिकारी एम. के. भांगे यांनी बैठकीचे सूत्रसंचलन केले.
 
Top