उस्मानाबाद : वृत्तपत्रात बातमी प्रसिध्‍द केल्याचा राग मनात धरुन उमरगा येथील एका पत्रकारास फोनवरुन जीवे मारण्याची धमकी देणा-या कचरा ठेकेदा-याच्या कर्मचा-यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघ व उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने निवेदनाद्वारे उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.
    निवेदनात म्हटले आहे की, रविवार दि. 25 ऑगस्ट रोजीच्या दै. दिव्यमराठीमध्ये  उमरगा येथील कचरा स्वच्छतेबाबत वृत्त प्रसिध्द झाले आहे. याचा राग मनात धरुन कचरा ठेकेदाराच्या कर्मचा-यांनी उमरगा प्रतिनिधी अरुण इगवे यांना मोबाईल वरुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अशाप्रकारे स्वत:चा भ्रष्टाचार लपवण्यासाठी पत्रकारावर दबाव टाकण्याचा हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. वृत्तपत्र स्वातंत्राची गळचेपी करणा-या संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देऊन शासनाकडे प्रस्तावित असलेला पत्रकार संरक्षण कायदा त्वरीत लागू करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनाची एक प्रत राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक याना देण्यात आले आहे. या निवेदनावर पत्रकार महेश पोतदार, विशाल सोनटक्के, चंद्रसेन देशमुख, प्रशांत कावरे, संतोष हंबीरे, जी.बी. राजपूत, संतोष जाधव, राजाभाऊ वैदय, बालाजी निरफळ, रविंद्र केसकर, राम खटके, उपेंद्र खटके, उमेश वाघमारे, सयाजी शेळके, बाळासाहेब माने, प्रविण पवार, सुधीर पवार आदींच्या स्वाक्ष-या आहेत.
 
Top