येरमाळा  -: येरमाळा पोलिस ठाण्यात मुख्य पदावरून एकाच खुर्चीसाठी दोन साहाय्यक पोलिस निरीक्षकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सुटीवर गेलेल्या अधिकार्‍याच्या जागेवर नवीन अधिकार्‍याची नेमणूक करण्यात आली. मात्र, सुटीवरून परतलेल्या अधिकार्‍यासह सध्या पदभार स्वीकारणार्‍या अशा दोघांनीही खुर्चीवर दावा सांगितल्याने हा वाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
    येरमाळा पोलिस ठाण्यासाठी मुख्य अधिकारी म्हणून साहाय्यक पोलिस निरीक्षक व त्यांना मदतीसाठी एक पोलिस उपनिरीक्षक आणि पोलिस कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, यातील उपनिरीक्षकाचे पद 30 जूनपासून रिक्त आहे. त्यातच साहाय्यक पोलिस निरीक्षक 15 दिवसांकरिता वैद्यकीय रजेवर गेल्याने त्यांचा पदभार उस्मानाबाद येथून पाठविलेल्या साहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. चव्हाण यांच्याकडे देण्यात आला. गेल्या पंधरा दिवसांपासून वरिष्ठांच्या आदेशानुसार चव्हाण हेच काम पाहात आहेत. परंतु दोन दिवसांपूर्वी सुटीवरून परतलेल्या राजेंद्र मोताळे यांच्यासह सध्याच्या सपोनि चव्हाण अशा दोघांनीही एकाच पदावर दावा के ल्याने हा प्रकार मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. मोताळेंच्या मते त्यांची मूळ नेमणूक असल्याने व ते सुटीवर गेल्याने चव्हाण यांच्याकडे पदभार दिला होता. आता सुटीवरून परतल्याने हा पदभार परत मिळावा. मात्र, चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार पदभार घेतला असून, त्यांनीच पदभार सोडण्याचे आदेश द्यावेत. एकंदरीत एकाचा खुर्चीसाठी दोन अधिकार्‍यांमध्ये सुरू असणार्‍या या रस्सीखेचमुळे ऐन गणेशोत्सवात येरमाळा पोलिस ठाणेअंतर्गत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कोण हाताळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
Top