उस्‍मानाबाद : केंद्र पुरस्कृत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम-2009 व राज्य शासन निर्णयानुसार येथून पुढे इयत्ता 1 ली ते 8 वी वर्गासाठी शिक्षक पदावर नियुक्त होणा-या उमेदवारांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. ही परीक्षा सर्व शाळा (सर्व व्यवस्थापन/माध्यम/परीक्षा मंडळे/खाजगी अनुदानित-विनाअनुदानित- स्वयंअर्थसहायित आदि) मध्ये काम करण्यास इच्छूक असणाऱ्या शिक्षकांसाठी लागू राहतील. तसेच कनिष्ठ प्राथमिक इयत्ता 1 ते 5 व उच्च प्राथमिक इयत्ता 6 ते 8 या दोन गटातील शिक्षक पदासाठी प्रत्येकी 1 प्रश्नपत्रिका राहील व त्याचे स्वरुप व काठिण्यपातळी अनुक्रमे माध्यमिक व उच्च माध्यमिक अभ्यासक्रमावर आधारित असेल. दिनांक 13 फेब्रुवारी,2013 च्या शासन निर्णयाने निश्चित केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त केलेले उमेदवार फक्त हया परीक्षेला प्रविष्ठ होण्यास पात्र राहतील.
पहिल्या शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन नोंव्हेंबर-2013 मध्ये प्रस्तावित करण्यात आले आहे. या संबंधित शासन निर्णय व माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in  या संकेत स्थळावर उपलब्ध असल्याचे  माहितीसाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) के.टी.चौधरी यांनी कळविले आहे.  
 
Top