उस्मानाबाद - सकाळपासूनच ईट महसूल मंडळातील नागरिकांनी ईटच्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या प्रांगणात गर्दी केली होती.  प्रशासनाशी निगडीत असलेले आपले काम तात्काळ होतेय, याचाच आनंद त्यांच्या चेह-यावर होता. महसूलसह आरोग्य, शिक्षण, कृषी आणि समाजकल्याण अशा नागरिकांच्या थेट हिताशी निगडीत असणा-या विभागांच्या योजनांची यशस्वी व्हावी, यासाठी राबविलेल्या समाधान योजना उपक्रमाच्या आयोजनावेळचे हे दृश्य ! एकाच छत्राखाली आलेले विविध विभाग आणि त्यातून जनतेची होणारी तात्काळ कामे याबद्दल पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्यासह उपस्थित मान्यवरांनीही कौतुकोद्गार काढले.
          निमित्त होते,  सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत समाधान योजना अर्थात प्रशासन जनतेच्या दारी या उपक्रम आयोजनाचे. भूम तालुक्यातील ईट महसूल मंडळासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उदघाटन आज श्री. चव्हाण यांच्या हस्ते झाले.  गोदावरी खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार राहुल मोटे, पंचायत समिती सभापती आण्णासाहेब भोगील, वाशीचे पंचायत समिती सभापती लक्ष्मीकांत आटोळे, बाळासाहेब हाडोंग्रीकर, अण्णासाहेब देशमुख, प्रशांत चेडे, सरपंच श्रीमती चव्हाण यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे, जि.प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत हजारे, अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील यांची यावेळी उपस्थिती होती.
          शासनाच्या विविध योजनांचा नागरिकांना थेट लाभ मिळावा, प्रशासनाविषयी असणारी नकारात्मक मानसिकता नाहिशी होऊन सकारात्मक दृष्टीकोनातून नागरिकांची कामे व्हावीत हा या समाधान योजना उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ईट महसूल मंडळातील नागरिकांनी याठिकाणी केलेल्या गर्दीने ही अपेक्षा सार्थ ठरवली.  या महसूल मंडळातील ईट, डोकेवाडी, नागेवाडी, पांढरेवाडी, झेंडेवाडी, पखरुड, ज्योतीबाचीवाडी, घुलेवाडी, गिरलवाड, जांब, मात्रोवाडी, ईराचीवाडी, निपाणी, आंद्रुड, लांजेश्वर, गिरवली, सोन्नेवाडी, अंजनसोडा, घाटनांदूर, चांदवड या गावातील नागरिक याचा लाभ घेण्यासाठी आले होते.
            पालकमंत्री चव्हाण यांनी या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. शासकीय कार्यालयाच्या खेटा मारण्यापेक्षा प्रशासन सकारात्मक पुढाकार घेऊन नागरिकांच्या अडचणी सोडवते आणि विविध शासन योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत घेऊन जाते, ही बाब कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी प्रातिनिधीक स्वरुपात विविध योजनातील लाभार्थींना प्रमाणपत्रे, अनुदान आणि साहित्याचेही वाटप केले.    
         शालेच्या प्रांगणात आरोग्य, कृषी, शिक्षण, समाजकल्याण तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची दालने उघडण्यात आली होती. त्या-त्या ठिकाणी संबंधित नागरिकांना त्यांना आवश्यक ती कागदपत्रे देण्यात येत होती. विविध योजनांसाठी असणारे अर्ज भरुन घेण्यात येत होते. पालकमंत्री चव्हाण, आमदार मोटे यांच्यासह इतर मान्यवरांनी या सर्व दालनांना भेटी देऊन नागरिकांना देण्यात येत असणाऱ्या सुविधांची माहिती घेतली.
       आ. मोटे यांनी महसूल मंडळातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी डॅा. नागरगोजे यांनी हा उपक्रम आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. अधिकाधिक विभागांचा सहभाग यात असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
       या  उपक्रमात तहसील कार्यालयाशी संबंधित जात, नॅन क्रिमीलेअर, रहिवासी, उत्पन्न आदी प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, सातबारावर वारस नोंद करणे, अज्ञान पालनकर्ता नोंद कमी करणे, निवडणूक ओळखपत्र वाटप, महसूल विषयक इतर सर्व कामे, विशेष साहाय्य योजना अर्ज स्वीकृती, प्रलंबित फेरफार नोंदीवर कार्यवाही, आम आदमी विमा योजनेच्या लाभार्थ्यांचे अर्ज, पारधी समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तसेच यासंदर्भातील अर्ज भरुन घेण्यात आले. याशिवाय, दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र व ग्रामपंचायत स्तरावरील विविध प्रमाणपत्रे देणे, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत घेतलेल्या विहिरींची नोंद घेणे, शिक्षण विभागाशी संबंधित अपंग समावेशित शिक्षण योजनेसाठी लाभार्थी यादी ठरविणे, अपंग विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या योजनांची माहिती, अस्वच्छ व्यवसायात असणाऱ्या कामगारांच्या मुलांचे शिष्यवृत्ती प्रस्ताव पडताळणी करुन दाखल करुन घेणे, मॅट्रीकपूर्व अल्पसंख्याक शिष्यवृत्ती  योजनेतील अऍनलाइन भरलेल्या फॅार्मच्या प्रती स्वीकारणे आदी कामे करण्यात आली.
        कृषी कार्यालयामार्फत लाभार्थ्यांना रेनगन व खते वाटप करण्यात आली. ठिबक सिंचन प्रस्ताव स्वीकारणे, माती नमुने तपासणी करण्यात आली. पशु संवर्धन विभागामार्फत पशुवैद्यकीय दवाखान्यात पशु आरोग्य तपासणी व लसीकरण मोहिम राबविण्यात आली. आरोग्य विभागाच्या वतीने नेत्रतपासणी, कुपोषित मुलांची आरोग्य तपासणी, महिलांची हिमोग्लोबीन चाचणी, किशोरवयीन मुलींची रक्त व हिमोग्लोबीन तपासणी आदी उपक्रम याठिकाणी घेण्यात आले. वीजमंडळाच्या वतीने शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणी, वीजबिलाची दुरुस्ती, घरगुती नवीन वीज जोडणी आदींचे फॅार्म भरुन घेण्यात आली.   याशिवाय याठिकाणी आधार कार्ड नोंदणी  कार्यक्रमही घेण्यात आला. त्यास नागरिकांनी सर्वाधिक प्रतिसाद दिला. अगदी रांगा लावून नागरिकांनी आपली आधार कार्ड मिळण्यासाठी नोंदणी केली. 
     जमीन मोजणी, आपत्ती व्यवस्थापन, निर्मल भारत अभियान कक्षानेही आपले माहिती दालन याठिकाणी ठेवले होते. भूमचे उपविभागीय अधिकारी एस. बी. महिंद्रकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचलन वृषाली तेलोरे यांनी तर आभारप्रदर्शन भूमच्या तहसीलदार अहिल्या गाठाळ यांनी केले.
 
Top