मुरुम -: उमरगा येथे तीन दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कंटेकूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगाची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.
    दि. 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत उमरगा येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कंटेकूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी 'बालकांच्या खेळातून विद्युत निर्मिती' हा प्रयोग सादर केला होता. जिल्हास्तरावरून निवडण्यात आलेल्या परीक्षण समितीने सदर शाळेच्या प्रयोगासंबंधी विद्यार्थ्यांचे कौतुक करत या प्रयोगाची राज्यस्तरावरील विज्ञान प्रदर्शनासाठी निवड केली आहे. सध्या ऊर्जा निर्मितीचा गंभीर प्रश्न असल्याने प्रयोगाच्या माध्यमातून काही उपाययोजना मिळणे शक्य असल्याचे समितीने सांगितले आहे. हा प्रयोग सादर करण्यासाठी सोनाली राजेंद्र कांबळे या विद्यार्थिनीने पुढाकार घेतला. सहशिक्षक नागनाथ सुतार, सुनील राठोड यांनी मार्गदर्शन केले. शाळेच्या प्रयोगाची राज्यस्तरासाठी निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक कमलाकर मोटे, केंद्रप्रमुख रमेश सावंत, विस्तार अधिकारी तात्या माळी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक तुकाराम साखरे, शालेय समिती अध्यक्ष लक्ष्मी शिंदे, सरपंच अनिता धुमाळ आदींनी कौतुक केले.
 
Top