उस्मानाबाद -: समाज घडवण्याचे काम करत असलेल्या शिक्षकांच्या पाठीवर लोकमंगल समूहाच्या माध्यमातून कौतुकाची थाप देण्याचे काम करण्यात येत आहे. हा सन्मान त्या व्यक्तीचा नसून त्याच्या पेशाचा आहे, असे मत नॅचरल शुगर इंडस्ट्रीजचे चेअरमन बी. बी. ठोंबरे यांनी व्यक्त केले. लोकमंगल प्रतिष्ठान व लोकमंगल मल्टिस्टेटच्या वतीने रविवारी शिक्षकरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
    भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अँड. मिलिंद पाटील, पोलिस उपअधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, लोकमंगल प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष रोहन देशमुख, अध्यक्ष ज्ञानेश्वर सूर्यवंशी, पालक संचालक रामराजे पाटील यांची या वेळी प्रमुख उपस्थती होती.
    ठोंबरे म्हणाले की, लोकमंगल समूहाच्या वतीने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजाचे उतराई होण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ग्रामीण अर्थकारण बदलणार्‍या साखर उद्योगाला सुरुंग लागण्याची भीती वाटत असताना लोकमंगलचे सर्वेसर्वा सुभाष देशमुख यांनी ही चळवळ पुढे नेण्याचे काम नेटाने केले आहे. यावेळी रोहन देशमुख म्हणाले की, लोकमंगलच्या वतीने प्रातिनिधीक स्वरुपात हा सत्कार केला जात आहे. निवड झालेलेच नव्हे, तर सर्व शिक्षक आदर्श आहेत. आज शासन शिक्षणावर मोठा खर्च करीत आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या शाळांऐवजी खासगी शाळांकडे पालकांचा कल अधिक वाढत असल्याचे दिसत आहे. बेरोजगारी सगळीकडे वाढत चाललेली असताना व्यवसाय शिक्षण देणार्‍या संस्थांची गरज आहे.
    अँड. मिलिंद पाटील म्हणाले की, आज पालक आपला विद्यार्थी कोणत्या शाळेत जातो, यापेक्षा तो गुणवान असला पाहिजे, असा विचार करत असल्याचे सांगितले. पूर्वी गुणवान विद्यार्थी घडवित असताना जी श्रमप्रतिष्ठा होती, ती आता लोप पावत चालली आहे. त्यामुळे परिस्थिती बिघडत चालली असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन मयुरी शेळके यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रा. संतोष नाईक यांनी मानले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील शैक्षणिक, शिक्षणप्रेमी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

 
Top