उस्मानाबाद -: ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांच्या  उन्नती व कल्याणासाठी बारा बलुतेदारांचे संघटन सक्षम करुन त्याला आर्थीक बळ देणेसाठी  बलुतेदारांचे राज्यव्यापी फेडरेशनची निर्मिती करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केले.
    येथील रायगड फंक्शन हॉल येथे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या संपर्क अभियानातंर्गत बलुतेदार ग्रामीण कारागीर  व उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, गोकुळ शिंदे, बलुतेदार गटसंस्थेचे चेअरमन  सुभाष पाटोळे,  जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक आर.बी.गायकवाड, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दुपारगुडे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी अनिल खेडकर  यांची उपस्थिती होती.
    पाटील म्हणाले की, बलुतेदार ग्रामीण कारागीर व उद्योजकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन भविष्यात त्यांना सक्षम करणे हा या मेळाव्यामागील उद्देश आहे. उद्योगासाठी केंद्र व राज्य पुरस्कृत 117 योजना आहेत. त्यात प्रामुख्याने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम हा आहे. या संपर्क अभियानातून बारा बलुतेदारांना मंडळाकडून जास्तीत जास्त कर्जाचे वाटप होऊन त्यांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे. जिल्ह्यातील 4 हजार 434 बलुतेदार सहकारी संस्थांची 2008 पासूनची 4 कोटी 74 लाख 47 हजार 394 रुपयांची कर्जमाफी मंजूर झाली आहे. मात्र त्याबाबत अंमलबजावणीसंदर्भात शासनस्तरावरुन पाठपुरावा करण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
      महिलांच्या उन्नतीसाठी मंडळाकडून एकात्मिक मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादन करणे ही योजना एक उपयुक्त व्यवसाय असून या उद्योगासाठी मंडळाकडून अनुदानही  मिळते. बचतगट महिला व शेतकऱ्यांनी गटागटाने हा व्यवसाय उभारावा, असे आवाहन केले. ग्राम उद्योगामार्फत निर्मिती झाल्यास जिल्ह्यातील दीड ते पावणेदोन लाख रोजगारांची निर्मिती या माध्यमातून होऊ शकते,  असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
    लाभार्थीने बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड ठरवून दिलेल्या मुदतीत करण्यासाठी  बलुतेदारांच्या मनात मानसिकता निर्माण करण्याचे काम मंडळ करीत आहे. बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी खादी ग्रामोद्योग मंडळाकडून विविध योजना राबवित आहोत, याचा लाभ ग्रामीण भागातील बलुतेदारांनी घ्यावा असे आवाहनही केले. जिल्हा वार्षीक योजनेतून मशीनरी  व साहित्याबाबत अनुदान यावर्षीपासून मिळेल. याचा फायदा जिल्ह्यातील 10 ते 12 हजार बलुतेदारांना होणार आहे. निष्ठेने काम करणाऱ्या कारागीरांना 5 ते 25 लाखापर्यंतच्या उद्योगाची उभारणी करण्यासाठी बीजभांडवल मंडळाकडून बिनव्याजी मिळेल,असे पाटील यांनी सांगितले.
    आमदार पाटील म्हणाले की, बॅकेचे कर्ज परतफेड केलेल्या लाभार्थीचे त्यांनी अभिनंदन करुन सर्वांना कर्जाची परतफेड करण्याची सूचना केली. अडचणी असतील तर मंडळाकडून सोडूवन घेऊन बुलतेदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.पाटील यांनी  केले. 
    यावेळी विविध उद्योगासाठी कर्ज घेतलेल्या व कर्जाची परतफेड केलेल्या 16 लाभार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
    यावेळी दुपारगुडे, गायकवाड, गोकूळ शिंदे, सुभाष पाटोळे यांची भाषणे झाली. मेळाव्याचे सूत्रसंचालन रवी सुतार यांनी तर प्रास्ताविक व आभार  खेडकर यांनी मानले. मेळाव्यास ग्रामीण भागातील कारागीर, महिला व उद्योजकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.
 
Top