उस्मानाबाद -: जीवन जगताना संकल्पाची आवश्यकता आहे. कारण संकल्पाशिवाय लक्ष नाही, लक्ष्याशिवाय यश नाही, यशाशिवाय मुक्ती नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जीवनाचा संकल्प करण्याची गरज असल्याचे सांगत, शिक्षणातून समाजातील दरी कमी करण्याचे धडे देण्याची आवश्यकता राष्ट्रसंत भैय्यू महाराज यांनी व्यक्त केली. येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
    अध्यक्षस्थानी शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले, आदर्शचे संस्थापक सरचिटणीस के.टी. पाटील, संतपीठाचे अध्यक्ष प्रकाश बोधले महाराज, शिवसेना लोकसभा पक्षनिरीक्षक गौरीश शानबाग, ह.भ.प. रमेश वाघ, आ. ज्ञानराज चौगुले, सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, कांदे-पाटील, कार्याध्यक्ष तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील उपस्थित होते.
     विद्यार्थ्यांनी जीवन कसे सुंदर होईल याचे शिक्षणातून धडे घेण्याची गरज आहे. समाजात चार प्रकारचे लोक असतात हे सांगताना त्यांनी उंदराचे उदाहरण दिले. पहिल्या प्रकारचा उंदीर स्वत:साठी बीळ तयार करतो पण त्यात राहत नाही, म्हणजे एखाद्या व्यक्तीला सर्व प्रकारच्या शास्त्राचे ज्ञान असते पण तसे तो वागत नाही, कारण त्याला त्यात रहायचेच नसते. दुसर्‍याला बीळ तयार करता येत नाही, पण त्याला कसे रहावे हे चांगले माहित असते. तिसर्‍या प्रकारचा उंदीर बीळ ही तयार करत नाही आणि त्यात राहतही नाही. आज समाजात अशाच उंदराचा वावर वाढलेला आढळतो. या सतत फिरणार्‍या उंदरामुळेच घराचे नुकसान होते. म्हणजेच ज्याला या घराशी काही देणेघेणे नाही, तो या घराचे नुकसानच करत सुटला असल्याचे महाराजांनी सांगितले.
     चेन्नई एक्सप्रेससारखा एखादा चित्रपट काही काळातच २२२ कोटीची कमाई करतो म्हणजे तिकडे समाजाचा ओढा आहे, पण सिमेवर देशासाठी प्राण देणार्‍या सैनिकांच्या घरी भेट द्यायला कोणालाही वेळ नसतो. राष्ट्र, समाज याविषयी एखाद्या व्यक्तीने काय योगदान दिले, याचा विचार करुन त्याला स्विकारा, भौतिक सुखाच्या मागे लागताना नैतिकता हरवत चालल्याची खंत व्यक्त करुन भौतिकवादाला नैतिकतेचा आधार देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
      मातृ शक्तीबद्दल आदर निर्माण करणारे तसेच नितिमत्ता निर्माण करणारे शिक्षण गरजेचे आहे, हे सांगताना शिक्षण व्यवस्थेला संकल्पातून बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. चौथ्या प्रकारच्या उंदराबद्दल सांगताना ते म्हणाले की, तुमचे घर निट चालावे यासाठी तुमच्या शिक्षणाचा सदुपयोग होण्याची आवश्यकता आहे, आणि आपल्या देशाला चौथ्या प्रकारच्या उंदराची गरज आहे. यावेळी बोलताना शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले म्हणाले की, शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांमधला चांगला गुण ओळखून शिक्षकांनी त्यालाच प्रोत्साहन द्यावे, शिक्षण घेत असताना देशाची सुरक्षा अर्थ व्यवस्था यावर विचार करण्याची गरज आहे. आज जगाचा अन्नदाता आत्महत्या करतो आहे, ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर आहे. प्रास्ताविक कार्याध्यक्ष सुधीर पाटील यांनी केले. त्यात त्यांनी संस्थेच्या गुणवत्तेचा आढावा घेतला. संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमाची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. यावेळी ह.भ.प. वाघ महाराज व ह.भ.प. बोधले महाराज यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमात संस्थेतील यशवंत गुणवंताचा सत्कार व सुर्योदय परिवाराच्या वतीने संस्थेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पाचशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच शहरातील एक हजार मुलींना तुळशीच्या रोपाचे वाटप करण्यात आले. आदर्श संस्थेच्या वतीने सुवरेदय परिवाराला २ लाख ५१ हजाराच्या देणगीचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते भैय्यू महाराजांकडे सुपूर्द करण्यात आले. भैय्यू महाराजांनी हा धनादेश तुळजापूर तालुक्यातील मुर्टा येथे एडस् बाधीत मुलांच्या वस्तीगृह बांधकामाला सर्मपित केला. सूत्रसंचालन पाटील व आघाव यांनी केले. सामुहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
 
Top