मुंबईत 11 जणांना डेंग्यूची लागण, पंढरपूरात डेंग्यूने 5 जण त्रस्त्त अशा हेडलाईन कांही वृत्तपत्रात झळकल्या. दि. 10 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत पंढरपूरात कार्तिकी यात्रा भरत आहे. लाखो वैष्णवजणांच्या या मेळाव्यात भाविकांना याची लागण न व्हावी याची दक्षता प्रशासनाने घेणे आवश्यक आहे.
    जनतेने केवळ प्रशासनावरच अवलंबुन न राहता डेंग्यू आटोक्यात आणण्यासाठी त्यात सक्रीय सहभाग नोंदविण्याची आवयकता आहे. डेंग्यू बाबत जनतेने सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. डेंगी म्हणजे काय ?  तो कशापासून होतो  ? त्याची लक्षणे कोणती ?  त्यावर करायचे उपाय आदी बाबींचा केलेला हा उहापोह....
        डेंग्यू ताप हा आजार विशिष्ठ विषाणूंमूळे होतो. डेंग्यूचा प्रसार एडीस एजिप्टाय या नावाच्या डासापासून होतो. या डासाची उत्पत्ती साठविलेल्या स्वच्छ पाण्यात होते. यामध्ये प्रामुख्याने इमारतीच्या टाक्यातील पाणी, सिमेंटच्या टाक्यातील पाणी, रांजणातील पाणी तसेच प्लास्टिकच्या बादल्या, रिकाम्या बाटल्या, नारळाच्या करवंटया, घरातील शोभेच्या कुंडया, फुलदाण्या, निरोपयोगी टायर्स, कुलर आदी मध्ये साठलेल्या पाण्यावर या डासाची उत्पत्ती होते. जनतेने कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा जास्त दिवस साठवुन ठेऊ नये. अन्यथा त्यामध्ये डास अंडी घालतात व त्या अंड्याचे रुपांतर पुन्हा डासात होते हे रुपांतर होऊ नये यासाठी पाणी आठ दिवसापेक्षा जास्त दिवस साठवु न देता याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
       ठिकठिकाणी पाणी साठविण्याची लोकांची वृत्ती दिसून येते. या वृत्तीमूळे अशा साठविलेल्या पाण्यात हे डास अंडी घालून डासोत्पत्ती करतात. या डासांची उत्पत्ती कमी करणे अथवा नियंत्रित करणे यासाठी लोकांचा सहभाग आवश्यक आहे. त्याशिवाय या आजाराचे नियंत्रण शक्य नाही. हा आजार झाल्यानंतर रुग्णामध्ये प्रामुख्याने पुढील लक्षणे आढळतात : - तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखी, सांधे दुखी, उलट्या होणे, डोळयांच्या आतील बाजुस दुखणे, अंगावर पुरळ, भुक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे, अशक्तपणा, रक्तातील प्लेटलेटची संख्या कमी होणे आदी लक्षणे दिसतात.
रक्तस्त्रावयुक्त डेंग्यू तापाची लक्षणे - रक्ताची उलटी होणे, पोट दुखणे, काळसर रंगाची शौचास होणे, त्वचेखाली नाकातून रक्तस्त्राव होणे, रक्तजलाचे प्रमाण कमी होऊन रुग्ण अस्वस्थ होणे, बेशुध्द होणे या गंभीर बेशुध्द अवस्थेला डेंग्यू शॉक सेंड्रोम असे म्हणतात. यामध्ये कदाचित रुग्णाचा मृत्यु होऊ शकतो. इतर कोणत्याही उपचारापेक्षा डेंग्यू शॉक सेंड्रोम व डेंग्यू हिमोरेजिक फिवर  (रक्तस्त्रावासह डेंग्यू ताप)  या रुग्णांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणे आवश्यक आहे.
डासोत्पत्ती कमी करणे :- या डासांची पैदास प्रामुख्याने अस्वच्छ घरामध्ये व भोवताली साठलेल्या व साठविलेल्या पाण्यातच होत असल्याकारणाने वरील परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. घरातील कुलर वापरात नसेल तर त्यातील पाणी काढून नीट सुकवून ठेवावा. पाण्याची भांडी दर आठवड्यातून किमान  एकवेळ  रिकामी  करुन  घासुन - पुसुन  कोरडी  करुन पुन्हा वापरावीत. भरलेली भांडी झाकुन ठेवावीत. गप्पी मासे हे डासांच्या आळ्या खातात त्यामूळे घरातील हौदात, पडीक विहिर तसेच कारंजे यामध्ये सोडावेत. जेणेकरून डासाचे प्रमाण कमी होईल. डासांना पळविणारे क्रीम, मच्छरछाप अगरबत्त्या, तेल तसेच अंग झाकणारे कपडे वापरावेत. घराच्या खिडक्यांना व संडासच्या व्हेंट पाईपना जाळ्या बसवाव्यात तसेच रुग्णांनी स्वत:च्या मनाने औषध सेवन न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या डेंग्यू बाधित रुग्णांसाठी  शासकीय रुग्णालयात उपचारांची सोय करण्यात येते.
      एखाद्या गोष्टीच्या यशस्वीतेसाठी लोक सहभागाशिवाय आवश्यक आहे. लोकसहभागाशिवाय कोणतीही योजना, राष्ट्रीय कार्यक्रम, मिशन अथवा अभियान यशस्वी होत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पोलीओ मुक्त भारत.  पोलीओ  निर्मुलनासाठी देशातील जनतेने आपला सक्रीय सहभाग दिल्याने या आजाराचे समुळ उच्चाटन करणे शक्य झाले आहे. आज जवळपास संपूर्ण देश पोलीओ मुक्तीच्या दिशेने वाटचाल करतो आहे. जनतेचा सहभाग व शासकीय यंत्रणांनी एकमेकांच्या हातात हात घालुन काम केल्यास या रोगापासून मुक्ती दूर नाही. लक्षात घ्या, "एडीस एजिप्टाय " या डासाची निर्मिती होऊ न देणे हाच डेंग्यू वरील सर्वात प्रभावी व उत्तम बचाव होऊ शकतो.

फारुक र. बागवान
माहिती सहाय्यक
उप माहिती कार्यालय, पंढरपूर

                               
 
Top