उस्मानाबाद - तुळजापूर तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत झालेल्या धान्य गैरप्रकरणातील आरोपींना पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे अभय देत असून त्यांनी पुरवठा मंत्र्यांना पत्रव्यवहार करताना हे आरोपी निर्दोष असल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी पालकमंत्र्यांनी राजीनामा देण्‍याची मागणी भाजपाच्यावतीने करण्यात आले असून उस्‍मानाबाद जिल्‍हाधिका-यांना याबाबतचे निवेदन देण्‍यात आले आहे.
तुळजापूर तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत आलेले धान्य ३० दुकानदारांनी बोगस रजिस्टर तयार करून धान्याचा अपहार केला होता.त्याची तक्रार करण्यात आल्यानंतर आयुक्यांनी जिल्हाधिका-यांना कारवाईचे आदेश दिले. जिल्हाधिका-यांनी तहसिलदारांना कारवाईचे आदेश दिले,मात्र तहसिलदारांनी पालकमंत्र्यांच्या दबाबामुळे या दुकानदारांवर कारवाई केली नसल्‍याचे आरोप करण्‍यात आले आहे. पालकमंत्री चव्हाण यांनी पुरवठा मंत्र्यांना पत्र लिहून हे आरोपी निर्दोष असल्याचे म्हटले आहे. भ्रष्ट दुकानदारांवर कारवाई करण्याऐवजी पालकमंत्री त्यांना पाठीशी घालत असल्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्‍यांनी जिल्हाधिका-यांना निवेदन देवून या दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. या निवेदनावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे,दत्ता कुलकर्णी, अ‍ॅड.अनिल काळे,रामदास कोळगे,अ‍ॅड.खंडेराव चौरे बाळासाहेब शामराज आदींच्या स्वाक्ष-या आहेत.
 
Top