
श्री तुळजाभवानीची धाकटी बहिण असलेल्या येडेश्वरी देवीचे हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या येडेश्वरी देवीची वर्षातून दोनदा मोठी यात्रा भरते. या यात्रेस राज्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येतात. आज दि. ५ ऑक्टोबर पासून नवरात्र महोत्सवास प्रारंभ होत आहे. हा नवरात्र महोत्सव ५ ते १३ ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. शनिवारी संध्याकाळी देवीचे मानकरी अमोल बापूसाहेब पाटील, दत्ता पाटील, सुभाष पाटील यांच्या हस्ते घटस्थापना करुन मेळावे पार पडतात. तसेच भजनी मंडळीही सहभागी होतात. यात घटस्थापनेच्या दिवशी देवीला नागवेलीच्या पानाची पुजा मांडली जाते. नंतर एक वेड्याची पुजा, दोन वेड्याची पुजा, चंद्राची पुजा, नारळाची पुजा, मोराची पुजा, साखळीची पुजा, वाघाची पुजा, बारवाची पुजा, आकड्याची पुजा अशा विविध पुजा देवीच्या मांडल्या जातात. या पुजेबद्दल मंदिर संस्थानकडे विचारले असता त्यांनी सांगितले की, या नऊ दिवसाच्या काळात देवी वेगवेगळी रुपे घेते. व या काळात देवी राक्षसासोबत युद्ध करते सिमोल्लंघनाच्या दिवशी युद्ध खेळून राक्षसाचा वध करते म्हणूनच त्या दिवशी दसरा साजरा केला जातो. दि. १३ रोजी बलीदान पुर्ण आहुती (पारणे) पहाटे ६ वा. सायंकाळी ५ नंतर सिमोल्लंघन छबीना पालखीसह आरती असा कार्यक्रम होणार आहे. नवरात्र काळात मंदिर ट्रस्टच्या वतीने जोरदार तयारी पुर्ण करण्यात आली आहे. स्वच्छता रंगरंगोटी आदी कामे पुर्ण करण्यात आली आहे व मंदिराच्या पाय-यावर तसेच शिखरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यंदा वरुणराजाने चांगली बरसात केल्याने मंदिर परिषद हिरवा शालू पांघरला आहे असे चित्र दिसत आहे. दर्शनासाठी येणा-या भाविकांची राहण्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आल्याचे मंदिर ट्रस्टचे सचिव राजाभाऊ बेंदरे यांनी सांगितले. या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन ही सज्ज झाले आहे.