उस्मानाबाद - सौंदर्याविषयाची जागरुकता वाढत असून महिलांनी सौंदर्य क्षेत्रातील अद्यावत ज्ञान प्रशिक्षणाव्दारे प्राप्त करुन स्वत:ची व्यवसाय निर्मीती करुन उन्नती साधावी,  असे आवाहन नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक चंद्रशेखर देशपांडे यांनी केले.  स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था व जिल्हा ग्रमीण विकास यंत्रणा उस्मानाबाद यांच्या  वतीने ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील 18ते 25 वयोगटातील महिलासाठी 30 दिवसाच्या कालावधीचे ब्युटी पार्लर व्यवस्थापन या प्रशिक्षण शिबीराचा निरोप समारंभप्रसंगी ते बोलत होते.
        याप्रसंगी स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक युवराज गवळी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक  भीमराव दुपारगुडे आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प संचालक श्रीपतराव राठोड याची प्रमुख उपस्थिती होती.
    देशपांडे पुढे म्हणाले की, प्रशिक्षणार्थ्यांची आर्थीक परिस्थिती पालटण्यासाठी आज जे व्यवसायरुपी इवलेसे रोपटे तुम्ही लावणार आहात त्याचे वटवृक्षामध्ये रुपांतर करण्याची क्षमता प्रशिक्षणार्थी महिलांत असणे आवश्यक असल्याचे नमूद केले.
         प्रास्ताविकात युवराज गवळी यांनी संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध  प्रशिक्षण, बँकांव्दारे कर्जाची सुविधा उपलब्ध करुन त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले जात असल्याची माहिती दिली.  संस्थेमार्फत इलेक्ट्रिक मोटार रिवांयडिंग प्रशिक्षण देण्यात येत असून ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील 18 ते 25 वयोगटातील पुरुषासाठी 29 ऑक्टोबरपर्यंत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. इच्छुकांनी  प्रवेशासाठी  मो. क्र. 7875443799 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले.
   दुपारगुडे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यवसायाला लागणा-या भांडवलापेक्षा स्वत:चा आत्मविश्वास महत्वाचा असल्याचे  सांगुन आजच्या स्पर्धेंच्या युगात टिकण्यासाठी कल्पकता व विश्वासाची सांगड घालणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.
         या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रशिक्षणार्थी रसिका घोडके आणि आभार प्रदर्शन प्रिया पवार यांनी केले. 
 
Top