कळंब (भिकाजी जाधव) -:  नोट पॅड, टॅब, आयपॉड आणि इंटरनेटच्‍या क्रांतीकारी युगात आता टेपरेकॉर्डरच्‍या कॅसेटस् आणि सीडी, डीव्‍हीडी इतिहास जमा व्‍हायला लागल्‍यात. तर मग ग्रामोफोन कोणाला आठवणार?
       पण मित्रहो, याच ग्रोमोफोनला आज 136 वर्षे पूर्ण होत आहेत. शास्‍त्रज्ञ थॉमस अल्‍वा एडिसन यानी दि. 29 नोव्‍हेंबर     1877 रोजी लावला. ज्‍यावेळेस एडिसनने ध्‍वनीमुद्रण करणा-या आणि ते वाजवणा-या उपकरणाचा शोध लावला, त्‍याला तो ग्रामोफोन म्‍हणत असे. ग्रामोफोनचा सर्वात प्रथम प्रयोग एडीसनने ‘मेरी हँड ए लिटल लँब’ हे सुप्रसिध्‍द इंग्रजी बालगीत  स्‍वतःच्‍या आवाजात ध्‍वनीमुद्रित करुन केला. एका दंडगोलाच्‍या बाजूवर विशिष्‍ट लेप देऊन त्‍यावर मुद्रीत करण्‍याच्‍या ध्‍वनीच्‍या कंपनांच्‍या अनुसार चढ उतारांचे मुद्रण व चढ उताराच्‍या अनुसार ध्‍वनीचे पुनरुत्‍पादन करण्‍याची ही पध्‍दत आहे. ग्रामोफोनच्‍या प्राथमिक अवस्‍थेत ध्‍वनी मुद्रणासाठी अगोदर दंडगोलाकृती ड्रम वापरला जात असे. मात्र नंतर त्‍याऐवजी तबकडीचा वापर करण्‍यात येऊ लागल्‍या. त्‍या तबकड्या लाखेच्‍या किंवा तत्‍सम पदार्थाच्‍या असत. या तबकडीच्‍या दोन्‍ही भागावर छबी मुद्रण केले जात असे.
असाच एक पन्‍नास वर्षापूर्वीचा ग्रोमोफोन कळंब शहरातील जि.प. प्रशाला (मुलांची) येथे आहे. दि. 1 डिसेंबर 1964 रोजी घेतलेल्‍या या ग्रोमोफोनला दि. 1 डिसेंबर 2013 रोजी पन्‍नास वर्षे पूर्ण होत आहेत. हा ग्रोमोफोन आजही सुस्थितीत आहे. कळंब येथे 1954 रोजी स्‍थापन झालेल्‍या जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेत ज्‍येष्‍ठ साहित्यिक प्रा. भास्‍कर चंदनशिव यांच्‍यासह शहरातील डॉक्‍टर, प्राध्‍यापक, शिक्षक, इंजिनिअर्स, पत्रकार, कवी, व्‍यापारी, अधिकारी यांचे शिक्षण झालेले आहे. तर अनेक नगरसेवक, नगराध्‍यक्ष व पुढारी या शाळेने घडवले आहेत. गोलाकार असलेल्‍या तबकडीवर टोकदार हेड टेकवून त्‍याला असलेले हँडल फिरवल्‍यास तबकडी फिरायला लागते. गोलाकार रेषावरुन हेड फिरताना ध्‍वनी निर्मिती होते. जन-गन-मन हे राष्‍ट्रगीत, वंदे मातरम्, ऐ मेरे वतन के लोगो, माऊली थोर तुझे उपकार, गणान घुंगरु हरवलं, सुखी ठेव देवा, अखेरचा हा तुला दंडवत, कवी माधव माधव ज्‍युलीयण यांचे प्रेमस्‍वरुप आई यासारख्‍या गितांच्‍या तबकड्या आहेत.
      कळंबमधील या शाळेत आज रोजी 340 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर एकूण 16 शिक्षक असल्‍याची माहिती शाळेचे मुख्‍याध्‍यापक बी.डी. ढवळे व विज्ञान शिक्षक तुकाराम गरुडे यांनी दिली.
 
Top