लोहारा :- देशाचे नेतृत्व दृष्टिहिन असल्याची टिका करीत केंद्र शासनाचे आर्थिक धोरण चुकीचे असल्याचे ते म्हणाले. देशात साखर मोठय़ा प्रमाणात असतानाही केंद्र शासनाने ५ लाख टन साखर आयात केल्याचे सांगत यामुळेच यंदा साखरेच्या भाव घसरल्याचे भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी लोहारा (जि. उस्‍मानाबाद) येथे सांगितले.
     लोहारा तालुक्यातील खेड-लोहारा खुर्द शिवारात लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज या खाजगी साखर कारखान्याच्या प्रथम चाचणी गळीत हंगामाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी खा. रुपाताई पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख रविंद्र गायकवाड, कॅनरा बँकेचे एम. जी. अजयन, पंजाब नॅशनल बँकेचे रजनिश भारद्वाज, बँक ऑफ इंडियाचे जी. एच. सारंगी, आ. ज्ञानराज चौगुले, माजी आ. राजाभाऊ राऊत, दिनकर माने, अँड. मिलींद पाटील, ह. भ.प. महेश महाराज, शामचैतन्य महाराज, माजी खा. सुभाष देशमुख, सीए. व्ही. पी. पाटील, रविकांत पाटील, महेश देशमुख, नेताजी गोरे, सुनील माने, सुभाष माळी, रज्जाक अत्तार, हरिष डावरे, चंद्रकांत महाजन आदींची प्रमुख उपस्थिती होती.
    पुढे बोलताना गडकरी म्‍हणाले की, साखर कारखानदारी ही सोन्याचे अंडी देणारी कोंबडी आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे शोषण करता कामा नये. साखर कारखानदारीमध्ये स्पर्धा वाढली आहे. शेतकर्‍यांच्या उसाला चांगला भाव मिळाला पाहिजे, शेतकर्‍यांचे जीवन बदलले पाहिजे. बेरोजगारी, गरिबी दूर करण्यासाठी तुमचे जीवन तुम्हीच बदलू शकता. त्यामुळे शेतकर्‍यांनी स्वत:च्या जीवनाचे स्वत:च शिल्पकार होणे गरजेचे आहे. माझ्या जीवनावर बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव असून, मी स्पष्ट बोलणारा आहे. बँका कधीच प्रामाणिक माणसाला कर्ज देत नाहीत. पैसेवाल्यांनाच कर्ज देतात. असे या बँकांचे धोरण आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली पाहिजे. तरच सर्वसामान्यांचा फायदा होईल. नाही तर सर्वसामान्य माणूस भरकटला जाईल. राज्यात विजेचा प्रश्न गंभीर असून, वीज आवश्यक असते, तेव्हा नसते आणि जेव्हा गरज नसते तेव्हा वीज उपलब्ध असते, असे आपले राज्य आहे. देशाला स्वातंत्र मिळून ६६ वर्षे झाली. मात्र साधी गोदाम बांधता न आल्याने धान्य कुजत असल्याचे सांगत, ही बाब दुर्भाग्यपूर्ण असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
    शेतकरी कर्जात जन्मतो, जगतो आणि कर्जातच मरतो, अशी कृषिप्रधान देशात शेतकर्‍याची स्थिती निर्माण झाल्याची टीका नितीन गडकरी यांनी केली. राजकारणातून सत्ता हा राजकारणाचा अर्थ नाही. तर राजकारण म्हणजे सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे ते म्हणाले. चांगले कामे केले की, फळही निश्‍चितपणे चांगलेच मिळते. राजकारण करतानाही समाजहित डोळ्यासमोर ठेवून काम केले पाहिजे. यामुळे समाजातील माणसाचे जीवन बदलते, हे सुभाष बापू देशमुख यांनी प्रत्यक्ष कृतीतून करून दाखविले आहे. असे गौरवोद्गारही गडकरी यांनी यावेळी काढले. शेतकर्‍यांनी उसासाठी ठिंबक सिंचन करावे. पावसाचा प्रत्येक थेंब अडविणे नितांत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे शेतकर्‍यांनी मोठय़ा प्रमाणात जलसंधारणाचे काम करण्याची आवश्यकताही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली.
    यावेळी लोकमंगलचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देशमुख बोलताना म्‍हणाले, माजी पंतप्रधान अटलबिहारी यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये खाजगी साखर कारखाने उभारण्याची परवानगी दिली म्हणून आज हा कारखाना साकारल्याचे त्यांनी सांगितले. किल्लारी व तुळजा भवानी साखर कारखाना शासनाने लोकमंगलला चालविण्यास दिला. हा करार पाच वर्षाचा असताना केवळ एक वर्षेच कारखाना चालवू दिला. मात्र मी निराश झालो नाही. कारण मी लढण्याला महत्व देतो, असे ते म्हणाले. शेतकर्‍यांनी शेतीपुरक व्यवसाय करावा. तरुणांनी उद्योग धंद्यासंदर्भात संकल्प मांडावा. त्याला लोकमंगल मदत करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकमंगलचे कार्याध्यक्ष रोहन देशमुख यांनी, तर आभार रावसाहेब पाटील यांनी मानले.
 
Top