सुप्रसिध्द नाट्य लेखकाची आयुष्याच्या उतार वयात मुलाखत घेण्यास आलेल्या पत्रकारांना आपल्या आयुष्यात आपण काय मिळविले आणि काय हरलो याचा उलगडा करत नाट्य क्षेत्रातील काही वास्तव समोर आणण्याचा प्रयत्न रविशंकर झिंगरे यांनी लिहिलेल्या दुसरा अंक या नाटकात केला आहे.
बँकेत नोकरी करत कवितेचा छंद जोपासत, नाटक लिहीण्याची व साहित्य निर्मितीची आवड निर्माण झालेला व कला जोपासणारा उल्हास कोळी हा या नाटकातील प्रमुख पात्र आहे. परिणामां ऐवजी तत्वाने लिखान करणार्‍या या उल्हासला संकटे एकामागून एक येतात. यावेळी घरातील आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याची पत्नी नेत्रा हिला मुलबाळ होत नसल्याने फार खिन्न असते. यातच तिला सातत्याने चक्कर येण्याचा त्रास सुरु होतो. त्याने लिहीलेल्या नाटकातील पहिला अंक तयार झाल्यानंतर त्याच्या पत्नी नेत्राला वाचून दाखवतो असे म्हणतांना ती सध्या नको जोपर्यंत या नाटकाचा दुसरा अंक तुम्ही लिहीणार नाहीत तोपर्यंत मला वाचून दाखवू नका असे सांगत, मला मुल होत नाही म्हणून तुम्ही दु:खी होऊ नका व मीही होत नाही, तुम्ही तयार केलेली नाटके हीच मला मुला बाळांसारखी आहेत. त्यांच्यावर मराझे तितकेच प्रेम असल्याचे नेत्रा म्हणते. तिच्या औषधोपचारासाठी सततचा होणारा खर्च, गावाकडे वडिलांचा खर्चासाठी पैसे पाठविणे यातच त्याची बँकेतील असलेल्या नोकरीवर गंडांतर येते. अनेक संकटे असतांनाही नेत्रा व वडिलांच्या जबाबदारीमुळे उल्हास पैसा मिळविण्याचे मार्ग शोधू लागतो. आपला पती दररोज वेगवेगळ्या संकटांचा सामना करत असल्याने आपल्या दुखणे अंगावर काढत ती त्रास असतांनाही काही होत नसल्याचे सांगत असते. परंतु तिच्या चकरा थांबत नाहीत. अनेक दवाखाने, अनेक तज्ञ डॉक्टरांना दाखवूनही तिच्यावर इलाज होत नाही. त्याचे दोन मित्र जयराम व नाथा हे उल्हासला या परिस्थितीतून बाहेर येण्याची प्रार्थना करत असतात जयरामचे त्याच्या तत्वपूर्ण लिखानावर चांगले मत व प्रेम असते. तर नाथा हा त्या लिखानामुळे उल्हासला कसलाही आर्थिक फायदा होत नसल्याने असले लिखान बंद करुन जगात चालणारे टिंगल टवाळी, मंगलाष्टका, विनोदी असे लिखान केल्यास भरपूर पैसा मिळेल असा सल्ला नाथा देतो. दरम्यान नोकरी गमावलेल्या उल्हासला त्याचे वडिल व पत्नीच्या उपचारासाठी पैशाची अत्यंत गरज भासते. आलेल्या संकटावर मात करण्यासाठी नाथाने सुचविलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवून उल्हास स्वत:च्या तत्वाचा चुराडा करुन लिखानाचा बाजार करणार्‍या दलालांच्या हातची बाहुली बनतो. त्याच्याकडे लिखानाचे कौशल्य असल्याने नाटकांचे व्यावसायिकरण करणार्‍या धनदांडग्या निर्मात्याबरोबर त्याचा करार होतो. यावेळी त्याला इसारादाखल चांगली रक्कम मिळते. सदरच्या रकमेत आपल्या पत्नीवर इलाज करुन असे ठरवून तो आपले कामकाज सुरु करतो. यावेळी आजाराने आतून खचलेल्या व आपल्या पती उल्हासवर व त्याच्या लिखानावर मुलासारखे प्रेम करणारी नेत्रा त्या नाटकाचा दुसरा अंक लिहावा आणि मला नाटक ऐकवावे अशी शेवटची इच्छा असल्याचे सांगते. व्यावसायिक लिखानातून वेळ मिळत नसल्याचे तर दुसरीकडे आपल्या पत्‍नीची इच्छा यात गोंधळून गेलेल्या अवस्थेतच त्याची पत्‍नी त्याच्या मांडीवर डोके टेकवून मयत होते. काही दिवसांत गावी असलेल्या वडिलांनाही देवाज्ञा होते. जिच्यासाठी लिखानाचं हे दुकान मांडलं तिच आपल्याला सोडून गेली आता त्या पैशाचा काय उपयोग, जगात आपले कोणीही नाही, आपल्या पत्‍नीची शेवटची इच्छादेखील आपण पूर्ण करु शकलो नाही, असे म्हणत मनोमन दु:ख वाटून तो दारु या व्यसनाच्या आहारी जातो. कोणत्याही प्रकारचे फालतू लिखान केले तरी त्याला चांगली प्रसिध्दी मिळते व वरचेवर जास्त पैसा मिळत असल्याने उल्हास आतूनही दु:खी होतो. उल्हास त्याच्या लिखानाचा दुसरा अंक पूर्ण करायचे ठरवतो यावेळी त्याच्या पहिल्या अंकाचा शोध घेतो तर त्याला ते सापडत नाही. नाथाला विचारल्यावर ते काही उपयोगाचे नसल्याने एका निर्मात्‍याला त्याचे हक्क विकल्याचे नाथा सांगतो. आता आपले नाटक कायमस्वरुपी अपूर्णच राहणार व आपल्या पत्नीची शेवटची इच्छादेखील पूर्ण करु शकत नसल्याने यावेळी माझ्या पत्नी नेत्राचे बाळ तू चक्क विकले फार मोठी चूक केली, असे म्हणत नाथाबरोबर असलेले सर्व संबंध तोडून टाकतो. यावेळी पुन्हा मुलाखतीच्या पात्रात त्या वृध्द झालेल्या उल्हास कोळीच्या भूमीकेपर्यंत दोन अंकी नाटक दुसरा अंकाला बार्शीतील प्रेक्षकांनी भरभरुन साथ दिली. अनेक दु:ख्या प्रसंगी अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू, संभाषणावेळी टाळ्या यामुळे गर्दीपेक्षा बार्शीतील दर्दी चांगल्या संख्येने उपस्थित होते.

५३ वी राज्य नाट्य स्पर्धा :
नाटकाचे नांव : दुसरा अंक
लेखक : रवि शंकर झिंगरे
निर्माती : स्वाती मोहोळकर
नेपथ्य : शैलेश मिरजकर, चैतन्य किल्लेदार,
पार्श्‍व संगीत : विक्रांत मोरे,
प्रकाश योजना : दिपक कसबे,
रंगभूषा : ओमप्रकाश श्रावण
रंगमंच व्यवस्था - शेखर गायकवाड, प्रसन्न गायकवाड, अशोक थोरात, अविनाश साखरे, ओंकार साठे, डॉ.तन्वंगी जोग
सूत्रधार - चैतन्य किलेल्दार
पात्र परिचय : प्रशांत जाधव (चैतन्य किल्लेदार), विश्वजीत जोशी (निलेश पाटील), नेत्रा (डॉ.यशश्री जोग), नाथा (मनोज परांजपे), जयराम (कौस्तुभ गोडबोले), वृध्द उल्हास कोळी (रवि मोहोळकर)

- मल्लिकार्जुन धारुरकर
बार्शी
 
Top