उमरगा (लक्ष्‍मण पवार) -: मुंबई व हैद्राबाद दोन शहरांचा सुवर्णमध्‍य साधणारे म्‍हणून उमरगा शहर व तालुक्‍यास ओळखले जाते. राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक नऊवरील महाराष्‍ट्र राज्‍याचे प्रवेशद्वार म्‍हणून उमरगा शहराचा नावलौकीक आहे. आजपर्यंतच्‍या कालावधीत  महामार्गालगतच्‍या छोट्या-मोठ्या व्‍यवसायाशिवाय दोन-तीन शिक्षण संस्‍था व दोन सहकारी साखर कारखान्‍याचा अपवाद वगळता संपूर्ण उमरगा  व तालुक्‍याचा कोणताच विकास झाला नसल्‍याचे दिसून येते. उमरगा तालुक्‍याच्‍या या दुर्भाग्‍यपूर्ण अधोगतीस आणि मागासलेपणास जबाबदार कोण? हा ज्‍वलंत प्रश्‍न ऐन लोकसभा निवडणुक महासंग्रामाच्‍या कालावधीत पेटल्‍याने खासदारकीचे डोहाळे लागलेल्‍या सर्वच राजकीय पक्ष आणि त्‍यांच्‍या संभाव्‍य उमदेवार व समर्थकांना जाचक ठरणार असल्‍याचे बोलले जात आहे.
    उमरगा शहराच्‍या पुर्वेस व पश्चिमेस जवळपास तीनशे किमी अंतरावर असणारे हैद्राबाद व मुंबई हे महानगरे व त्‍यांना जोडणारा राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ हा आहे.  येथून  देशभरातील  दररोज हजारो वाहनांची ये-जा चालू असते. परंतु या बाबींचा येथील लोकप्रतिनिधींसह नागरिकांना कोणताच उपयोग करुन घेता आलेला नाही. त्‍यामुळेच तालुक्‍याचा गेल्‍या अनेक दशकामध्‍ये काहीच विकास झाल्‍याचे दिसत नाही. मुरुमच्‍या माळरानावर विठ्ठलसाई तर समुद्राळजवळ भाऊसाहेब बिराजदार या दोनच साखर कारखान्‍यांची उभारणी झालेली आहे. कोळसूरला शिवशक्‍ती कारखान्‍याची उभारणी धिम्‍यागतीने सुरु आहे.
    राष्‍ट्रीय महामार्गावर जकेकूर चौरस्‍ता येथे महाराष्‍ट्र औद्योगिक महामंडळाने बारा वर्षापूर्वी तालुक्‍यातील जकेकूर, एकुरगा, कोरेगांव व एकुरगावाडी या परिसरातील जमिनी संपादित केल्‍या. तेथील शेतक-यांनेही आता आपल्‍या तालुक्‍याचे भाग्‍य उजळणार या आशेने काळजावर दगड ठेवून आपल्‍या जमिनी औद्योगिकरणासाठी दिले. त्‍यामुळे आपल्‍याला काहीतरी उद्योग मिळेल व पोरांनाही नोक-या लागतील, या आशेवर गेल्‍या बारा-पंधरा वर्षापासून शेतकरी झुरतो आहे. परंतु त्‍यांचे नशीब फुटके म्‍हणावे लागेल. जे धंदे येथे चालू होत आहेत, तेथे नोक-या स्‍थानिकांना सोडून बाहेरच्‍यांना दिल्‍या जात आहेत. त्‍यामुळे राज्‍यातल्‍या राजकारणांची 'टिमकी' मिरवणा-यांनाही याबाबत लक्ष घालावसे वाटले नाही.
    उमरगा तालुका हा तसा दुष्‍काळी तालुका म्‍हणून शिक्‍का बसलेला आहे. त्‍यामुळे परिसरातील कष्‍टक-यांनी मुंबई, पुणे, हैद्राबाद गाठून अथवा राष्‍ट्रीय महामार्गालगत छोटासा व्‍यवसाय थाटून या महामार्गाचा एवढाच काय तो उपयोग केला. प्रत्‍येक पक्षाच्‍या राजकारण्‍यांनी हेव्‍यादाव्‍याच्‍या राजकारणात तालुक्‍याचा विकास मात्र वेशीला टांगला आहे. मागील काही कालावधीपासून येथील लोकसभेसाठी लातूर मतदार संघाला जोडण्‍यात आला होता. परंतु गत लोकसभेसाठी हा भाग उस्‍मानाबाद मतदार संघाला जोडण्‍यात आल्‍याने उस्‍मानाबाद जिल्‍ह्याच्‍या श्रेष्‍ठींनीही आजपर्यंत झाले गेले धुळीला मिळाले, असे म्‍हणून औद्योगिकरणाला चालना देण्‍यासाठी तालुक्‍याकडे लक्ष देण्‍यास सुरुवात केली आहे. येथील वसाहतीत प्रथमच मोठ्या प्रमाणात बियर फॅक्‍टरीची निर्मिती झाली असून दाळमील, चुरमुरे निर्मिती, रेडिमेड गारमेंट, पुट्टानिर्मिती, पाईप निर्मिती, केमिकल भेसळ निर्मिती यांचे कारखाने निर्मिती होऊन पुर्णत्‍वाकडे आहेत. असे असले तरी लोकसभेसाठी स्‍टंट असल्‍याचे व विकास आमच्‍या मार्गदर्शनाखाली होत असल्‍याचे बोलले जात आहे. येणा-या लोकसभा निवडणुकीत तरी कारखान्‍यांच्‍या माध्‍यमातून शेतक-यांच्‍या शेतातील ऊसाचे होणारे राजकारण मात्र हद्दपार होणार आहे.
    लोकसभेचे डोहाळे लागलेल्‍या उमेदवारांनी दृष्‍टीकोन समोर ठेवून विकासाच्‍या बाबतीत अगोदर लक्ष घातले असते तर सद्यस्थितीत तालुक्‍याचे चित्र वेगळे दिसले असते. त्‍यामुळे तालुक्‍याच्‍या आजपर्यंतच्‍या अधोगतीला नेमके जबाबदार कोण? लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील उमेदवार, प्रशासनातील गबरगंड अधिकारी की स्‍थानिक नेते? असा प्रश्‍न सुज्ञ नागरिकांतून विचारला जात आहे.
 
Top