लोहारा :- खेड (ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) येथील लोकमंगल माऊली शुगर इंडस्ट्रीज साखर कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवार दि. 14 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय
अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून होणार आहे. सभासद कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन माऊली उद्योग समुहाचे व्ही.पी.पाटील यांनी केले.या कार्यक्रमास भाजपा पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगुंटीवार, लोकमंगल उद्योग समुहाचे अध्यक्ष तथा माजी खासदार सुभाष देशमुख, माजी खासदार रुपाताई निलंगेकर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अँड. मिलिंद पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. रविंद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, संभाजी पाटील निलंगेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा, उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील औसा या पाच तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकर्यांचा प्रश्न लक्षात घेऊन या कारखान्याची उभारणी केली आहे. 3 जानेवारी 2012 रोजी या कारखान्याची पायाभरणी करण्यात आली होती. अल्पावधीतच कारखाना उभारण्यात आला आहे. प्रतिदिन सहा हजार मेट्रिक टन गाळप क्षमता असलेल्या या कारखान्यात 15 हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळणार आहे. पाचशे ट्रक, ट्रॅक्टर लागणार असून, 500 ऊसतोड कामगारांच्या टोळ्या कार्यरत होणार आहेत. उमरगा-लोहारा तालुक्याला एकूण 52 मेगावॅट विजेची गरज आहे. लोकमंगल माऊली कारखान्यात 30 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे.
लोकमंगल माऊली साखर कारखाना पूर्ण स्वयंचलित आहे, असे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणारा महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना आहे. तर भेल कंपनीचे टरबाईन, थरमॅक्स कंपनीचे बॉयलर वापरणारा भारतातील पहिला कारखाना असल्याचे व्ही.पी. पाटील यांनी सांगितले.

