उस्मानाबाद :- बालपणी कष्टात काढलेलं जीवन, ‘गारवा’ने तरुणाईवर केलेलं गारुड, पंडीत सत्यदेव दुबेंच्या सहवासानं उजळून गेलेलं जीवन आणि गीत-कवितांच्या माध्यमातून आणि अभिनयाच्या जोरावर चित्रपटक्षेत्रात स्वकर्तृत्वानं मारलेली भरारी... अशा एक ना अनेक आठवणींचा कप्पा उलगडत सर्वांचा लाडका सौमित्र अर्थात अभिनेते किशोर कदम दिलखुलास गप्पांत रंगून गेले. निमित्त होते, जिल्हा माहिती कार्यालयाने दि. 4 ते 6 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केलेल्या ग्रंथोत्सव उपक्रमाचे!
       सांस्कृतिक सभागृह, आनंदनगर येथील सभागृहात आयोजित या उपक्रमाची  पहिल्याच दिवसाची सायंकाळ सौमित्रने आनंददायी बनविली. सहजसोपा संवाद, दिलखुलास मनमोकळेपण, मराठीसह ऊर्दू आणि हिंदी भाषेवर असणारी त्याची पकड श्रोत्यांना भावली. त्याचा प्रत्येक शब्द ऐकण्यासाठी जणू सारे सभागृह थबकून बसले होते. त्याच्या संवादानंतर होणारा टाळ्यांचा गजर हा प्रत्येकाच्या मनात लपलेल्या सौमित्रला जणू पुन्हा बोलता करत होता. कवी रवींद्र केसकर आणि अश्विनी भोसले यांनी सौमित्रला बोलते केले.
       त्याची ती निरागस अदा, संवादफेकीची एक अनोखी शैली अन त्यासाठी त्याने घेतलेली प्रचंड मेहनत याची पावती त्याच्या प्रत्येक शब्दातून समोर बसलेल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचत होती. ‘बघ तुझी आठवण येते का?’… अशी सुरुवात करताच जणू गारव्याचा थंड आल्हाददायी अनुभव आसपासचं वातावरण भारावून गेला. नंतर जवळपास दोन-अडीच तास सुरु होता तो सौमित्र नावाच्या कवीनं-अभिनेत्यानं आणि एका संवेदनशील आणि सामाजिक भान जपणाऱ्या माणसानं केलेला मनमोकळा संवाद...
      हिंदीतील सुप्रसिद्ध कवी शरद जोशींच्या आठवणीत सौमित्र रंगून गेला. बालपणीच्या आठवणी सांगताना जणू ते बालपण शब्दांच्या माध्यमातून त्याने रसिकांपर्यंत मांडले. केवळ एकट्याच्याच नव्हे तर कवीवर्य शंकर वैद्य यांची छत्री कविता, दासू वैद्यांची कविता आणि वैभव जोशींची कवितांची उदाहरणे देत त्याने श्रोत्यांच्या काळजाला हात घातला. जोगवातील तृतीयपंथियाची भूमिका करताना मनाची झालेली घालमेल, एक कलाकार म्हणून आव्हान स्वीकारण्याची केलेली तयारी अशा एक ना अनेक गोष्टींवर तो भरभरुन बोलला. समांतर ते व्यावसायिकतेचा प्रवासही त्याने रेखाटला.
       बदलल्या काळाशी समरस होणारे आपण आणि जुनं ते सोनं मानणारी जुनी पिढी हे वास्तव सौमित्रने ‘कम्पुटरशी माझ्या आईचं देणंघेणं नाही’ या शब्दांत समोर मांडलं.
       दाहक वास्तव ते रंगीबेरंगी दुनिया, प्रेमाचे दिवस ते संघर्षाचे दिवस यांचा प्रवास कवितेच्या माध्यमातून त्यांनी रसिकांसमोर मांडला. कवी गुलझार यांच्या आठवणीत सौमित्र रंगून गेला. कवितेचा आणि एकंदरीत मराठी साहित्याचा आंतरराष्ट्रीय पॅनोरमा मांडताना अरुण कोलटकर, पद्मश्री नामदेव ढसाळ यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
       स्वताला आवडणाऱ्या कवितांनी  रसिकांना अक्षरशा गुंतवून ठेवले.
 
Top