उस्मानाबाद :- ग्रंथोत्सवातील बुधवारची सायंकाळ खऱ्या अर्थाने उस्मानाबादकर रसिकांच्या दृष्टीने अविस्मरणीय ठरली. चंदेरी दुनियेत मराठी नाममुद्रा अभिमानाने मिरवणारी आणि निखळ सौंदर्यांचं वरदान लाभलेली अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि त्यांचा जीवनसाथी रुचिर कुलकर्णी यांनी उस्मानाबादकरांशी साधलेला दिलखुलास संवाद आणि त्या गप्पांतून उलगडत गेलेली एकमेकांच्या नात्यातील वीण, प्रेमाची गोडी अअनेक किश्श्यांसह बरेच काही.... तब्बल अडीच तास रसिक देहभान विसरुन हा क्षण अक्षरश: जगले. निमित्त होते, जिल्हा माहिती कार्यालयाने आयोजित केलेल्या ग्रंथोत्सव या उपक्रमाचे!
      ग्रंथोत्सव उपक्रमात दुसरा दिवस गाजला तो प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि ख्यातनाम वकील रुचिर कुलकर्णी या रियल लाईफ जोडीशी झालेल्या दिलखुलास गप्पांमुळे! कवयित्री तृप्ती अंधारे आणि पत्रकार महेश गायकवाड यांनी या जोडीशी संवाद साधला. विशेष म्हणजे मृणाल कुलकर्णी यांचे सासरे प्रसिद्ध अभिनेते जयराम कुलकर्णी, सासूबाई डॉ. हेमा कुलकर्णी, दीर आनंद व जाऊबाई विनया कुलकर्णी या सासरच्या मंडळींच्या उपस्थितीत या दोघांचा होणारा मुलाखतीचा कार्यक्रम त्यांच्या जीवनातही पहिला आणि अनोखाच ठरला.
      मृणाल-रुचिर या जोडीच्या गप्पांतून उलगडत गेल्या त्यांच्या आयुष्यातील अनेक आठवणी, त्यांनी जागवलेले प्रेमाचे क्षण... एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर प्रपोज करण्याची आठवण, एस.पी. महाविद्यालयात असताना रुचिर यांनी सर्व मित्रांना मृणाल यांना वहिनी म्हणण्याची केलेली सक्ती... असे एक ना अनेक किस्से या गप्पांतून उलगडले. विशेष म्हणजे एकमेकांच्या नात्यातील वीण त्यांनी छान गुंफली. मृणाल अभिनेत्री, रुचिर वकील..तरीही त्यांच्या नात्यात असणारा सुसंवाद.. त्याला कारण ठरलेली त्यांची मैत्री, प्रेम अन लग्नानंतर एकमेकांवर असणारा विश्वास.. हे सारे त्यांनी उस्मानाबादकर रसिकांसमोर मांडले. रसिकही या आठवणींशी स्वत: मनोमन जोडले गेले.
रुचिर यांनी अंबेजवळगेच्या बालपणीच्या सांगितलेल्या आठवणी, भाऊ आणि मित्रांबरोबर केलेल्या खोड्या, त्यामुळे मोठ्यांचा मिळालेला मार अशा आठवणींना उजाळा दिला. वकीली करत असतानाही एकमेकांच्या जपलेल्या आवडीनिवडी, एकमेकांना दिलेली ‘स्पेस’ एकत्र कुटूंबपद्धतीत झालेले संस्कार आणि त्या संस्कारावरच सुरु असणारी वाटचाल ही आवर्जून रसिकांसमोर मांडली..
     एकत्र कुटुंबाने केलेला गो.नी.दांडेकर यांच्या कादंबरीच्या अभिवाचनाचा अनोखा प्रयोग, त्याला ठिकठिकाणी मिळत असणारी दाद याच्या आठवणीही रुचिर यांनी जागवल्या. अभिवाचनासाठी मृणालला वेळ मिळत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
      मृणाल कुलकर्णी यांनीही त्यांना असणारं वाचनाचं वेड, घरात असणारं पुस्तकांचं भांडार, नवरा-बायको नात्यातील आत्मियता, सासरच्या मंडळींकडून मिळणारं प्रेम, माहेरचा साहित्याचा असणारा समृद्ध वारसा, दूरचित्रवाहिन्यांनी दिलेली वेगळी ओळख, रमा, अवंतिका, सोनपरी ते मॉ जिजाऊसाहेब, रमाबाई आंबेडकर यांच्या भूमिकांनी मिळालेलं मानसिक समाधान.. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात टाकलेलं पाऊल अशा अनेक आठवणी रसिकांसमोर उलगडल्या.
      वयंम या मासिकाच्या माध्यमातून बालसाहित्याची चालवलेली चळवळ, कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज प्रतिष्ठानने चालविलेल्या पुस्तकांची पेटी उपक्रमाला दिलेलं पाठबळ, सासू-सासऱ्यांविषयीची आणि नातेवाईकांविषयीची कृतज्ञतेची भावना त्यांनी मुलाखतीच्या माध्यमातून रसिकांसमोर मांडली.
       अतिशय रंगलेल्या या मुलाखतीचा आनंद रसिकांनी घेतला. रसिकांच्या प्रतिसादामुळे सभागृहाबाहेर थांबलेल्या रसिकांसाठी स्वतंत्र स्क्रीनद्वारे सोय करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांनी रुचिर-मृणाल कुलकर्णी या जोडीचे स्वागत केले. जयराम कुलकर्णी व सर्व कुटुंबियांचे स्वागत मराठवाडा साहित्य परिषदेचे उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे यांनी केले.
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा माहिती कार्यालयातील सर्व सहकारी, मसापचे पदाधिकारी-सदस्य यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले. 
 
Top