उमरगा (लक्ष्मण पवार) :- उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार प्रा. रविंद्र गायकवाड यांना भरघोस मताने विजयी करा, असे आवाहन शिवसेनेच आमदार ज्ञानराज चौगुले यांनी काळनिंबाळा (ता. उमरगा) येथील कॉर्नर बैठकीत उपस्थित जनसमुदायासमारे केले.
यावेळी बोलताना आ. ज्ञानराज चौगुले म्हणाले की, प्रा. रविंद्र गायकवाड हे सामान्यत जनते एकरुप होणारे व्यक्तिमत्व असून ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या पक्षाच्या ध्येय धोरणानुसार वाटचाल करणारे नेते आहेत. उमरगा व लोहारा तालुक्यात विविध विकास कामांच्या माध्यमातून त्यांनी चांगली छाप टाकली आहे. प्रा. गायकवाड यांच्या प्रयत्नामुळेच उमरगा व लोहारा तालुक्यात असंख्य सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण झालेली आहेत. भुकंपाच्या काळात भुकंपग्रस्त भागात केलेली कार्य, लोहारा तालुक्याची निर्मिती, उमरगा शहरात शंभर खाटाचे उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती, जिल्हा न्यायालयासाठी प्रयत्न यासारख्या विविध विकास कामांतून गायकवाड यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मागील लोकसभेच्या निवडणुकीत काठावर झालेल्या पराभवाचे शल्य तुम्हा-आम्हांच्या सर्वांच्या मनात असून मागे झालेल्या चुका दुरुस्त करुन त्यांना भरघोस मताने निवडून देण्यासाठी उमरगा व लोहारा तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचे सांगून देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना विराजमान करावयाचे असल्यास रवि सरांना विजयी करणे अत्यंत महत्तवाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोविंद बिराजदार हे होते. यावेळी शिवसेनेचे उमरगा उपतालुकाप्रमुख सुधार पाटील, दाळींब विभागप्रमुख खय्युम चाकुरे, रामपुर गावाचे माजी सरपंच सुधारक भोसले, काळनिंबाळ्याचे सरपंच शिवाजी सांगवे, माजी सरपंच दिगंबर पाटील, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन कल्याण कारभारी, बाळू राठोड, महादेव सरवदे, राजेंद्र राठोड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दिगंबर पाटील यांनी केले.