भूम : तालुक्यातील मागील दोन तीन दिवसापासून वादळी वा-यामुळे घरांचे तसेच शेतक-यांचे मोठे नुकसान झाले असुन या नुकसानग्रस्तांना भरपाई मिळेल असे आश्वासन पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी हाडोंग्री येथे पाहणी दरम्यान सांगितले.
    दि. ५ मे रोजी हाडोंग्री येथे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे २ मे रोजी वादळी वा-याने झालेल्या नुकसानाबाबत पाहणी करण्यास आले होते. २ व ३ मे दरम्यान दोन दिवस वादळी वा-यामुळे हाडोंग्री गावातील शाळेसह बहुतांश घराचे मोठे नुकसान झाले होते. अनेक घरावरील पत्र्याबरोबर जनावराच्या कडब्याच्या पेंड्या उडून गेलेल्या होत्या. हाडोंग्री गावच्या झालेल्या या नुकसानीची पाहणी मधुकरराव चव्हाण यांनी सोमवारी केली.
    यावेळी आ. राहुल मोटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, जि. प. चे माजी अध्यक्ष बाळासाहेब हाडोंग्रीकर, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष विलास शाळू, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष रोहन जाधव उपस्थित होते.
    यावेळी पालकमंत्र्यांनी भूम, परंडा, वाशी या तिन्ही तालुक्यातील वादळी वा-यामुळे झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपविभागीय अधिकारी संतोष राऊत, तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्यासह तिन्ही तालुक्यातील महसुल व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. हाडोंग्री ग्रामस्थांनी मधुकरराव चव्हाण यांना नुकसानीबाबत लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी निवेदन दिले.
 
Top