जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे जिल्ह्यात हत्तीरोग दुरीकरणासाठी एक दिवसीय सामुदायीक औषधोपचार मोहिम दि. 14 ते 20 डिसेंबर,2015 या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात  येत आहे. ग्रामीण भागात तीन दिवस तर शहरी भागात पाच दिवस हत्तीरोग प्रतिबंधक डीईसी गोळया खाऊ  घालण्याचा एक दिवसीय सामुदायीक औषधोपचार मोहिमेत सर्वांनी डी ई सी व अल्बेडझॉल गोळ्याचे सेवन करावे. ती यशस्वी करण्यासाठी जिल्हा हिवताप अधिकारी श्री.बोरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.एस.फुलारी, डॉ.एम.आर. पांचाळ, जिल्हा रुग्णालय, शिक्षण विभाग व  आरोग्य विभाग यांचे मोलाचे सहकार्य या कामी लाभत आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनजागृतीचे विविध कार्यक्रमही या कालावधीत घेण्यात येणार असल्याने नागरिकांनी या उपक्रमास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी एन.एन.बोरकर यांनी केले आहे. 
         हत्तीरोगाचा प्रसार हा क्युलेक्स मादी डासापासुन होतो. या डासांची निर्मिती ही नाल्या, घाण पाणी, सेप्टीक टँक इत्यादी ठिकाणी होते. बुचेरिया बॅक्राप्टाय व ब्रुगीया मलायी नावाच्या परोपजीवी जंतुमुळे हत्तीरोग हा आजार होतो. दुषीत व्यक्तीस डास चावला असता त्याचे शरीरातील मायक्रोफायलेरिया रक्ताबरोबर डासांच्या शरीरात प्रवेश करतात. डासांच्या शरीरामध्ये जंतुची साधारण 2 ते 3 आठवडे वाढ होऊन ते संसर्गक्षम बनतात. असे संसर्गक्षम डास निरोगी माणसाला चावला की हत्तीरोगाची लागण होते. 
हत्तीरोगाची  लक्षणे-लसीकाग्रंथी सुज,दाह,ताप येतो,पुरूषामध्ये वृष्णासह हात,पाय व बाह्य जननेद्रयावर सुज,हायड्रोसील इत्यादी आढळून येतात.हत्तीरोग निदान करण्यासाठी रात्र कालीन  सर्वेक्षणात रक्त नमुना गोळा करणे व प्रयोग शाळेत तपासणी करणे.रक्त नमुने तपासणीमध्ये एम.एफ(मायक्रोफायलेरीया) जंतु आढळून आल्यास त्यावर समुळ उपचार करण्यासाठी डी ई सी गोळया वयोगटानुसार दिल्या जातात.
प्रतिबंधक उपाय योजना म्हणून रुग्णास ताप आल्यास तात्काळ नजिकाच्या आरोग्य संस्थेमध्ये अथवा गृहभेटी दरम्यान येणाऱ्या प्रत्येक आरोग्य कर्मचारी मार्फत रक्त नमुना घेवून तात्काळ तपासणीकरीता प्रयोग शाळेकडे पाठवावे. मच्छरदाणी व रासायणीक कॉईल्सचा वापर करावा.डास निर्मिती स्थानकामध्ये डास अळी भक्षक गप्पी मासे सोडावेत साचलेले डबके वाहते करावेत. घरातील पाणीसाठे आठवडयातुन एक दिवस कोरडे करून कोरडा दिवस पाळावा जे पाणी साठे रिकामे न करता येणाऱ्या साठयामध्ये आवश्यकतेनुसार अंबेट चे द्रावण टाकावे.सेप्टीक टॅकच्या व्हेट पाईपला जाळी बसविणे, नाल्या गटारी वाहते करणे किंवा त्यांच्यावर ऑईल टाकावे. 
या कालावधीत ग्रामीण व शहरी भागामध्ये डी.ई.सी व अल्बेडझॅल गोळया खाऊ घालण्याकरीता घरोघरी आरोग्य कर्मचारी/स्वयंसेवक जाणार आहेत. तरी त्यांच्या समक्ष 2 वर्षाखालील बालके, गरोदर माता व गंभीर आजारी रूग्ण वगळुन सर्वाना डी. ई. सी व अल्बेडझॅल गोळयाचे सेवण करून हत्तीरोग दुरीकरण मोहिमेस सहकार्य करावे. 
या कालावधीत गोळया वाटपासाठी आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेवक, अंगणवाडी कार्यकर्ती/मदतनीस व स्वयंसेवक यांची, क्षेत्रीय पर्यवेक्षकीय कर्मचारी म्हणून तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी (आरोग्य) आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहायक तर जिल्हा पर्यवेक्षक म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा क्षयरोग अधिकारी, सहायक संचालक (कुष्ठरोग),निवासी वैद्यकीय अधिकारी (बाहय),अति. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा साथरोग अधिकारी आणि जिल्हा हिवताप अधिकारी यांचा समावेश असणार आहे. याशिवाय उमरगा, लोहारा, तुळजापूर, उस्मानाबाद, कळंब,वाशी, भूम आणि परांडा येथे याच कालावधीत  एम.डी.ए. पर्यवेक्षण अधिकारी म्हणून स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. 
        या मोहिमेत जिल्ह्यातील एकही नागरिक वंचित राहून नये,यासाठी प्रत्येक कुटूंबाच्या  घरोघरी जावून आरोग्य यंत्रणेमार्फत स्वयंसेवक/आरोग्य कर्मचाऱ्यांसमक्ष या गोळ्यांचे वितरण होणार असून त्यांच्या समक्ष त्या गोळया सेवन कराव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.                                                 
 - अशोक रामलिंग माळगे,
दुरमुद्रकचालक,
जिल्हा माहिती कार्यालय, 
उस्मानाबाद

 
Top