उस्मानाबाद : मराठा क्रांती क्रांतीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला उस्मानाबादेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या काकासाहेब शिंदे यांना उस्मानाबाद येथे आज मंगळवार रोजी सकाळी श्रद्धाजंली वाहण्यात आली. यावेळी मराठा आरक्षणासाठी नाकरतेपणा दाखवल्याबद्दल राज्यातील सर्व आमदारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन आमदारांची नावे लिहून त्याला चप्पलाचे हार घालण्यात आले.
मंगळवार दि. 24 जुलै रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सकल मराठा समाजातील तरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमा झाले. यावेळी काकासाहेब शिंदेंना श्रद्धांजली वाहण्यात आली. काकासाहेब शिंदे अमर रहे है च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. सरकार व मराठा लोकप्रतिनिधीच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरुन मोटारसायकल वरुन फेरी काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टायर जाळून आमदारांचा निषेध करण्यात आला.
सुरक्षेच्या कारणाहून एकही एस. टी. बस स्थानकाबाहेर निघाली नाही. स्थानकात प्रचंड पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. आंदोलकांच्या मागे पोलिस व्हॅन होत्या.