उस्मानाबाद :- मराठवाड्यातील सर्वात शेवटचा जिल्हा असल्याने रेल्वेच्या सोयी-सुविधा अन्य जिल्ह्यातील नागरिकांच्या तुलनेत उशिरा मिळतात. त्या तातडीने मिळाव्यात त्याचबरोबर रखडलेले रेल्वे मार्ग आणि रेल्वेस्थानकावरील रेंगाळलेली कामे पूर्णत्वास जाण्याकरिता आवश्यक असलेल्या सूचना मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयाकडून मागविण्यात आल्या आहेत. आपल्या परिसरातील रेल्वेबाबतच्या विविध समस्या आणि मागण्यांची सूचना नागरिकांनी नोंदवावी, असे आवाहन रेल्वे उपभोक्ता समितीचे सदस्य तथा जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री यांनी केले आहे.
      रेल्वेबाबतच्या विविध तक्रारी, समस्या, नवीन सूचना आणि प्रवाश्याच्या गरजेनुसार नवीन रेल्वेगाड्या, वाहतूक मार्गातील बदल अथवा नवीन थांबे देणे आदी विषयांवर नागरिक आणि रेल्वे ग्राहकांकडून आलेल्या सूचना आणि शिफारशी यांची या समितीच्या बैठकीत दखल घेतली जाते. सोलापूर येथील मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयाने उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून संजय मंत्री यांची या समितीच्या सदस्यपदी निवड केली आहे. या बैठकीत उस्मानाबाद जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित मागण्या, शिफारशी आणि नवीन सूचनांची चर्चा केली जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी 25 जुलैपूर्वी संजय मंत्री यांच्याकडे आपल्या सूचना, तक्रारी अथवा नवीन रेल्वेमार्ग, थांबे किंवा नवीन गाड्यांबाबत असलेल्या मागण्या पाठवून जिल्ह्यातील अधिकाधिक प्रश्न या समितीच्या बैठकीत मांडावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. या सूचना, तक्रारी अथवा मागण्या संजय मंत्री, मारवाडी गल्ली, बालाजी मंदिराशेजारी उस्मानाबाद या पत्त्यावर पाठवाव्यात, असेही मंत्री यांनी आवाहन केले आहे.

 
Top