मुरूम :

राजर्षी शाहू महाराजांनी त्याकाळी पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला आश्वारुढ पुतळा बसविण्याचा संकल्पक निर्णय घेतला असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे माजी राज्य सरचिटणीस प्रा.किरण सगर यांनी केले. उमरगा येथील दी लाॅर्ड बुद्धा ट्रस्ट, तथागत वाचनालय व  तथागत बचतगट यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता.२६) रोजी आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दी लाॅर्ड बुद्धा ट्रस्टचे उपाध्यक्ष एम.एस.सरपे होते.

पुढे बोलताना प्रा.सगर म्हणाले की, खास बैठक घेऊन १९१७ साली हा जगातील पहिला आश्वारुढ पुतळा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता परंतु पुण्यातील काहीं मंडळींच्या विरोधामुळे त्यास विलंब होत गेला. स्मारक समितीच्या माध्यमातून काम सुरु होते. पुढे मुंबईत या पुतळ्याचे काम चालू असतानाच शाहू महाराजांचे निधन झाले. हे काम पुढे राजवंशज जिवाजी शिंदे यांनी पूर्ण केले. आठ खंडातील सुटा हा अजस्र पुतळा मालवाहू रेल्वेने पुण्यात आणून सात महिन्यात अहोरात्र काम करुन व जोडून तयार करण्यात आला. शिवछत्रपतींचा हा दिव्यभव्य जगातील पहिला आश्वारुढ पुतळा पुणे (भांबुर्डी) येथे दिसतो. त्याची मुळ संकल्पना व प्रेरणास्थान राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची होती.  शाहू महाराजांच्या विचारांचा लेखाजोखा मांडतांना त्यांनी त्यावेळच्या घटनाक्रम सांगून जीवनपट मांडला.

 अध्यक्षीय समारोप करताना एम.एस.सरपे यांनी शाहू महाराजांच्या जयंतीचे महत्त्व सविस्तरपणे सांगितले. यावेळी शिवाजीराव कुलकर्णी, वाय.एस.मड्डे, दिगंबर बिराजदार, बर्मा गुरुजी, फुलचंद गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डी.एम.कांबळे यांनी तर प्रास्ताविक तथागत बचतगटाचे सचिव  डी.टी.कांबळे यांनी केले. आभार बचतगटाचे सदस्य पाशा कोतवाल यांनी मानले. सध्या कोरोनाचे संकट असून संसर्ग होऊ नये म्हणून विशेष काळजी घेवून जयंती साजरी करण्यात आली.
 
Top