जळकोट,दि.२४ : मेघराज किलजे
गेल्या तीन महिन्या पासून कोरोना या संसर्ग आजाराने कहर केला आहे.कोरोना या संसर्गजन्य आजाराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अशा या महामारीच्या संकटात एकमेकांना माणुसकीच्या भावनेने आधार देण्याची गरज निर्माण झाली आहे . कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावा मुळे जनजीवन भयभीत झाले आहे. उमरगा शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. संसर्ग रोखण्या करीता नगर परिषदेच्या नगरसेवकांनी आपआपल्या वार्डाची जबाबदारी घेऊन जनतेला धीर देण्याची गरज असल्याचे माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यानी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना आयोजित बैठकीत आदेशीत केले आहे.
आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणात सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करून उमरगा नगर परिषदेतील काँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीचे आयोजन केले.या वेळी पाटील यांनी नगरसेकांना उमरगा शहरात वाढत चाललेल्या कोरोना संसर्गाच्या उपाययोजनांची माहीती दिली.
कोरोना या महामारीच्या संकटात काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांसह नगरसेवकांनी माणुसकीचे दर्शन घडविण्याची गरज निर्माण झाली आहे.कोरोना या संसर्ग आजारा बाबत नगरसेवकांनी जनजागृती हाती घ्यावी व त्याची काटेकोर पणे अंमलबजावणी करावी. तसेच ऑक्सीमीटर, थर्मलस्कॅनर , घरोघरी जाऊन करावे . प्रत्येक वार्डावार्डात १० स्वयंसेवकांच्या नेमणुका कराव्यात. शहरा मध्ये सोडियम हायफोक्लोराईडची फवारणी तात्काळ करण्यात यावी. बाहेरुन शहरात येणाऱ्यां रॅपीड, ( अँन्टीजन ) टेस्ट करणे सक्तीचे करावे . मास्क , सॅनेटायझरचा वापर बंधनकारक करावा. आयुष काढा , गरम पाणी , वाफ , व्यायाम , प्रतिकार शक्ती वाढविणारा आहार या बाबत नागरीकांचे प्रबोधन करावे. शनिवार पासून उमरगा शहरात संचारबंदी लागू करण्यात येत आहे . संचारबंदीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. शहरातील होणाऱ्या लग्न समारंभ , एंगेजमेंट सारख्या सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध घालावेत. भाजीपाला , फळे ,किराणा व इतर सर्व व्यवहार संचारबंदीच्या काळात बंद ठेवावेत. कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या वार्डातील संचारबंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी. अशा सुचना या वेळी त्यांनी उपस्थित नगरसेवकांना व कार्य कर्त्याना दिल्या.
या आजाराने भयभीत झालेल्या सर्व सामान्य माणसांची सेवा करण्याची हिच खरी वेळ आहे. माणुसकीचे खरे दर्शन दाखवून जनतेला धीर द्या . असेही पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले. या बैठकीसाठी प्रकाश आष्टे ,सुभाष राजोळे,दिलीप भालेराव,प्राचार्य डॉ. दिलीप गरूड नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे सह काँग्रेस पक्षाचे नगरसेवक .विजय वाघमारे,नगरसेवक अतिक मुन्सी,विक्रम मस्के,वसिम शेख उपस्थित होते.