लोहारा, दि. 21 : तालुक्यातील जेवळी (पूर्व) येथील महावितरणचे रोहित्र (डीपी) हे उघडे असून त्याची दयनीय अवस्था झाली आहे. महावितरणचे संबंधित अधिकारी, कर्मचारी जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे. धोकादायक बनलेल्या या महावितरण डीपी मुळे भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून महावितरणच्या वरिष्ठ अधिका-यांनी याप्रकरणी लक्ष घालून सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
लोहारा तालुक्यातील जेवळी या गावालगत बंजारा समाजाची वस्ती आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून डीपीची दुर्दशा झालेली आहे. अधूनमधुन लाईट येते व जाते. महावितरणचे कर्मचारी वेळेवर येत नाहीत. त्यामुळे लाईनमेनचे काम ग्रामस्थांनाच करावे लागत आहे. डीपीच्या परिसरात भरमसाठ गवत वाढलेले आहे. हे गवत खाण्यासाठी जनावरे येतात. डीपी उघडी असल्याने विद्युत वाहक तारा बाहेर आल्यामुळे जीवितास धोका आहे. त्याचबरोबर लहान लहान मुले डीपीजवळ येवून खेळतात. याप्रकरणी वरिष्ठांनी गांभिर्याने त्वरित लक्ष घालून या रोहित्राची डागडुजी करुन सुरळितपणे वीजपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.