मुरुम : प्रदीर्घ सेवेनंतर आमच्या परिवारातील कर्मचारी जरी सेवानिवृत्त झाले तरी ते आमच्या परिवारातीलच घटक असल्याने ते कायम या परिवाराचे सदस्य राहतील असे प्रतिपादन उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.                              
पुढे बोलताना शरण पाटील म्हणाले की, नगर शिक्षण विकास मंडळ ज्या उद्देशाने कै.माधवराव उर्फ काका यांनी  या संस्थेत जी परंपरा चालविली त्या परंपरेनुसार या संस्थेत आपण दिलेल्या योगदान व सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करत असताना आम्हाला खूप सार्थ अभिमान वाटतो. आपल्या हातून जी सेवा घडली ती अशीच सेवा पुढच्या काळात देखील आपल्या हातून घडावी हीच सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. सध्या कोरोना संकटाचे सावट असल्याने परिवारातील सर्व घटकांनी एकमेकांची काळजी घेणे गरजेचे असल्याचे शरण पाटील यावेळी म्हणाले. 

प्रतिभा निकेतन विद्यालयाचे मुख्याध्यापक काशीनाथ मिरगाळे, प्रा.विष्णू शिंदे, सहशिक्षक राहूल गायकवाड व कर्मचारी महावीर नारायणकर या चौघांचा सेवानिवृत्तीबद्ल प्रतिभा निकेतन विद्यालयात नगर शिक्षण विकास मंडळाच्या वतीने सत्कार मंगळवारी (ता.३०) रोजी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील व नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव यांच्या हस्ते सपत्नीक भेट वस्तू देवून करण्यात आला.

यावेळी श्री माधवराव पाटील  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, माजी मुख्याध्यापक गुरुसिध्द वर्दे, उपप्राचार्य सुधीर अंबर आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कै.माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी प्राचार्य डॉ.अशोक सपाटे, गुरुसिद्ध वर्दे, काशीनाथ मिरगाळे, राहुल गायकवाड, सुधीर अंबर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.करबसाप्पा ब्याळे यांनी केले. सूत्रसंचालन सहशिक्षक उल्हास घुरघुरे तर आभार इरफान मुजावर यांनी मानले.

Recent News

 
Top