![]() | ||
- रेखा सोनकवडे, | मुख्याध्यापिका |
गेली चार महिने होऊन गेले, कोरोना महामारी मुळे अजूनही शाळा महाविद्यालय सुरु न झाल्याने विद्यार्थी आज ही शाळेपासून लांबच आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने विद्यार्थ्यांना याचा फटका बसू नये म्हणून शासनाने ऑनलाईन शिक्षणावर भर देत 'शाळा बंद ऑनलाईन शिक्षण सुरू' करण्यात आले आहे.
सध्या सर्वत्र ऑनलाईन पध्दतीने शाळांमधील अध्यापनाचे कार्य सुरु आहे. यंदा नुकताच भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 74 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. गेल्या चार महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या कोरोनाचा प्रकोप सहा महिन्यानंतरही कायम असल्याने यंदा येणाऱ्या प्रत्येक सण, समारंभ, उत्सवांवर मात्र विरजण पडले आहे. याचाच परिणाम यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवावरही झाला आहे.
यावर्षी साध्यापणाने स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण करण्याचे आदेश शासनाने दिल्याने पहिल्यांदाच शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांविना स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाकरिता फक्त ठराविक शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्यांच्या उपस्थित स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही शाळा सुरु न झाल्याने विद्यार्थी शाळेपासून लांबच राहिले.शनिवारी भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 74 वा वर्धापन दिन सर्वत्र साजरा करण्यात आला. स्वतंत्रता दिवस हा प्रत्येकासाठी अपूर्व सोहळा आहे. दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून, शूर वीरांच्या बलिदानाने आम्हाला स्वातंत्र्य मिळाले आहे.
स्वातंत्र्य दिन म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत जल्लोष, उत्साह, चैतन्य, स्फूर्ती निर्माण करणारा दिवस आहे. या दिमाखदार सोहळ्याच्या अदल्यादिवशी मुलांची तयारी म्हणजे अवर्णनीयच आहे. पहाटे उठून स्नान करून शाळेचा गणवेश परिधान केलेली मुले म्हणजे जणू आयपीएस अधिकाऱ्याच्या रुबाबात शाळेच्या दिशेने निघालेली असतात. रोजच्या शाळेतील अभ्यासाची कटकट नाही. पाठीवर दप्तराचे ओझे नाही. अतिशय प्रफुल्लित व प्रसन्न मनाने राष्ट्रध्वजाला सलामी देण्यासाठी आणि या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या शूरवीरांना नमन करण्यासाठी मुलांचा ताफा शाळेत पोहोचतो.
प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर लाडू, बिस्किट, चॉकलेट या गोड पदार्थांचा आस्वाद घेत. परत त्याच ऐटीत घराकडे निघणे असा हा विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्य सोहळा संपन्न व्हायचा. परंतु यंदा मात्र कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे ज्ञान मंदिराची दारे अजूनही बंदच राहिल्याने यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात विद्यार्थ्यांचे स्वातंत्र्यच हरवल्याचे चित्र पहायला मिळाले.विद्यार्थी शाळेत न जाता आपल्या घरात, अंगणात अथवा वाड्यावस्त्यावर त्याच जोमाने आणि त्याच उत्साहाने स्वातंत्र्य सोहळा आयोजित करून व राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन सोहळ्याचा आनंद लुटताना विद्यार्थी दिसून आले.
स्वातंत्र्य सोहळ्यावर बंदी असताना ही घरात अंगणात व वाड्यावस्त्यावर ध्वजारोहण करुन झेंड्याला मानवंदना देत पुन्हा एकदा देशाभिमान जागृत करणार्या बालगोपाळांना प्रत्येक नागरिकांच्या ह्रदयात स्थान मिळाले आहे. स्वातंत्र्यदिनाकरिता दरवर्षी शाळा, महाविद्यालयामध्ये आदल्या दिवशी पासूनच तयारी सुरु व्हायची. शाळांचा परिसर तोरणांनी सजविला जायचा. स्वातंत्रदिनी विद्यार्थ्यांची गावातून प्रभातफेरी काढली जायची. विद्यार्थ्यांसह मान्यवरांचे भाषणही व्हायचे, पण यावर्षी कार्यक्रमांवर मर्यादा आल्याने केवळ ध्वजारोहण करण्यावरच भर दिला गेला आहे.
काही गावातील शाळेत शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान सर्वांनी सोशल डिस्टंन्सिंग पाळून मास्कचा वापर करून स्वातंत्र्य सोहळा पार पाडला.काही ठिकाणी स्वातंत्र्यसैनिकास ध्वजारोहणाची संधी मिळाली. तर काही ठिकाणी तंटामुक्त अध्यक्ष, कोराना योद्ध्यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आले. दर वर्षी स्वातंत्र्यदिना दिवशी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आंतरशालेय, आंतरमहाविद्यालयीन वादविवाद, प्रश्नमंजूषा, देशभक्तीपर गीत, देशभक्तीपर निबंध, भाषण आदी कार्यक्रम घेतले जात होते. या मुळे विद्यार्थी उत्साहाने प्रत्येक स्पर्धेत आवडीने भाग घेत स्वातंत्र्य सोहळ्यात सहभागी होत असे.परंतु यंदा मात्र स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यातील विद्यार्थ्यांचे स्वातंत्र्य हरवल्याचे चित्र पहायला मिळाले आहे.
- रेखा सोनकवडे,
मुख्याध्यापिका जिल्हा परिषद मराठी शाळा,
वागदरी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर