वाढत्या तापमानामुळे जीवसृष्टी अलर्ट मोडवर
जागतिक पर्यावरण दिन विशेष - ५ जून, २०२६
लेखक - डॉ. प्रितम भि. गेडाम

झाडे हाच जीवनाचा एकमेव आधार आहे. झाडांचा अंत म्हणजे पृथ्वीवरील जीवनाचा अंत. निसर्गाचा साधा नियम आहे की झाडे आपले रक्षण करतात आणि आपणही त्यांचे रक्षण केले पाहिजे. जर आपण निसर्गाच्या संरक्षणासाठी १ टक्का जरी योगदान दिले, तरी निसर्ग आपल्याला १०० टक्के समृद्धी परत देतो. कोरोना काळात आपण सर्वांनी पाहिले की, जेव्हा निसर्गात मानवी हस्तक्षेप थांबला, तेव्हा निसर्ग स्वतःला झपाट्याने समृद्ध करत होता. आज ही एक विडंबनाच आहे की, ते निस्वार्थ, समृद्ध झाड, ज्याने अनेक दशके आईप्रमाणे आपल्या कुशीत सावली देऊन उन्हापासून आपले रक्षण केले, आपल्याला फळे आणि फुले दिली, पक्ष्यांना आश्रय दिला, पावसाळ्यात जमिनीची धूप रोखली, मानवांसाठी विषारी असलेला कार्बन डायऑक्साइड शोषून आपल्याला जीवनदायी ऑक्सिजन दिला. वातावरणातील आर्द्रता आणि तापमान नियंत्रित करून नैसर्गिक संसाधने समृद्ध करण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. आज, तेच झाड तोडताना लोकांना कोणताही पश्चात्ताप वाटत नाही, जेव्हाकि त्याचे आपल्या संपूर्ण जीवनावर आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. आपण इतके नीच, स्वार्थी लोक आहोत का, की जो आपल्याला जीवन देतो त्याचाच जीव आपण घेऊ?

आज आपण सर्वजण बदलत्या नैसर्गिक पर्यावरणाचे परिणाम भोगत आहोत. स्वार्थी लोकांच्या चुकीच्या धोरणांनी संपूर्ण पर्यावरणाला विषारी बनवले आहे. नैसर्गिक संसाधनांचे अतिशोषण आणि जंगलतोडीमुळे पृथ्वीचे तापमान वाढले आहे, ज्यामुळे नैसर्गिक आपत्ती आणि रोगांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. प्रदूषण सतत वाढत आहे, सिमेंट रस्ते भट्ट्यांसारखे तापतात आणि भूजल पातळी झपाट्याने कमी होत आहे. अन्नधान्यामधील हानिकारक रसायनांचे सतत वाढणारे प्रमाण लोकांना मृत्यूच्या दारात ढकलत आहे. दहा-पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत, जेव्हा मुले उन्हात फिरायची आणि खेळायची, तेव्हा फक्त उष्णता जाणवायची. खेळताना झाडाच्या सावलीत बसले की थंड वाटायचे. पण आता, हा सूर्यप्रकाश विषारी वाटू लागला आहे; तो केवळ शरीर तापवत नाही, तर उकळी आणून माणसाला आजारीही पाडतो. शहरांच्या काँक्रीटच्या जंगलात, दाट सावली देणारी झाडे पाहणे दुर्मिळ होत चालले आहे.

उष्णतेच्या लाटांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे, आणि याचा सर्वाधिक फटका गरीब, वृद्ध, मुले आणि असंघटित कामगारांना बसतो, कारण त्यांचा ह्या उन्हात उदरनिर्वाहाचा संघर्ष विशेषतः वेदनादायी असतो. सीईईडब्ल्यूनुसार, बांधकाम कामगार, गिग वर्कर्स आणि झोपडपट्टीत राहणारे लोक यांसारखे असुरक्षित गट उष्णतेच्या ताणास सर्वाधिक बळी पडतात. या उष्णतेत त्यांचे उत्पन्न आणि उत्पादकता दोन्ही घटतात. उष्णतेच्या लाटांमुळे २०३० पर्यंत जीडीपीमध्ये ४.५ टक्क्यांपर्यंत संभाव्य घट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पिकांचे नुकसान आणि अन्नसुरक्षा धोक्यात येईल. 'द लॅन्सेट' मध्ये प्रकाशित झालेल्या २०२४ च्या एका अभ्यासानुसार, उष्णतेच्या लाटांदरम्यान कार्यक्षमता कमी झाल्यामुळे दरवर्षी अंदाजे १९४ अब्ज डॉलर्सच्या उत्पन्नाचे नुकसान होते. या शतकाच्या अखेरीस संपूर्ण भारतातील उन्हाळ्यातील उष्णतेच्या लाटांमध्ये ३०० ते ४०० टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

उन्हाळ्यात भूजल पातळीत सतत घट होत असल्यामुळे, अनेक गावकऱ्यांना आणि दुर्गम भागातील रहिवाशांना पाण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागतो. या समस्येशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर वारंवार व्हायरल होतात, ज्यात लहान मुलांपासून ते वृद्ध महिलांपर्यंत सर्वजण थोड्याशा पाण्यासाठी दररोज अनेक किलोमीटर चालताना दिसतात. आपला जीव धोक्यात घालून, ते घागरींमध्ये दूषित पाणी गोळा करण्यासाठी ५०-६० फूट खोल खड्ड्यांमध्ये उतरतात. पाण्यासाठीचा हा संघर्ष आणि असहाय्यता पाहून मन हेलावून जाते. निसर्गाने सर्वांना स्वच्छ पाणी, हवा आणि पौष्टिक अन्न मिळवण्याचा समान हक्क दिले आहे, परंतु स्वार्थी मानवाने निसर्गाचा समतोल बिघडवून सर्व जीवांना धोका निर्माण केला आहे. जर लोकांची ही अवस्था आहे, तर या वाढत्या तापमानात जंगलातील मुक्या वन्य प्राण्यांची अवस्था किती बिकट असेल.

भौगोलिकदृष्ट्या, आपला देश उष्णकटिबंधीय प्रदेश मानला जातो. वाढत्या हरितगृह वायू उत्सर्जनामुळे वातावरणातील उष्णता वाढली आहे, ज्यामुळे तापमानात सातत्याने वाढ होत आहे. नैसर्गिक हिरवळ आणि नैसर्गिक शीतकरण संसाधने झपाट्याने कमी होत आहेत. वेगाने विस्तारणाऱ्या शहरांनी नैसर्गिक भूदृश्यांची जागा काँक्रीट आणि काचेच्या इमारतींनी घेतली आहे. या इमारती दिवसा उष्णता शोषून घेतात आणि रात्री हळूहळू बाहेर सोडतात, ज्यामुळे सूर्यास्तानंतरही शहराचे तापमान कमी होत नाही. विकासासाठी, शहरांच्या आसपासच्या गावांमध्ये सुपीक जमिनीवर, शेतजमिनीवर इमारती बांधल्या जात आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेनुसार, जगभरात दरवर्षी अंदाजे १ कोटी हेक्टर जंगल नष्ट होते, जे दर १२ महिन्यांत आइसलँड किंवा पोर्तुगालच्या क्षेत्राएवढे जंगल तोडण्यासारखे आहे. ग्लोबल फॉरेस्ट वॉचनुसार, भारतात शेती, जंगलतोड आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे दरवर्षी १,००,००० हेक्टरपेक्षा जास्त नैसर्गिक जंगल आणि वृक्षाच्छादन नष्ट होते. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या मते, विकास प्रकल्पांसाठी सरकारी परवानगीने दरवर्षी सुमारे २० ते ३० लाख झाडे तोडली जातात.

भारताने १९९० ते २००० या काळात ३,८४,००० हेक्टर जंगल गमावले, परंतु २०१५ ते २०२० या काळात हा आकडा वाढून ६,६८,४०० हेक्टर झाला. ऊर्जा आणि उपयुक्तता खर्चाची तुलना करणाऱ्या युनायटेड किंगडम-स्थित 'युटिलिटी बिडर' या वेबसाइटच्या अहवालानुसार, या काळात सरासरी ६,६८,४०० हेक्टर जंगल गमावलेल्या ब्राझीलनंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या अहवालात पुढे असे म्हटले आहे की, २०१५ ते २०२० या काळात ब्राझीलने २५,५९,१०० हेक्टर आणि इंडोनेशियाने १८,७६,००० हेक्टर जंगल गमावले असताना, भारताच्या आकडेवारीत लक्षणीय वाढ झाली आहे. 'डाऊन टू अर्थ'नेही हे वृत्त दिले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई आणि अभिमत विद्यापीठ सस्त्रा च्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असे समोर आले आहे की, २०१५ ते २०१९ या काळात भारताच्या वनक्षेत्रात लक्षणीय घट झाली आहे. या वर्षांमध्ये भारताने १८ चौरस किलोमीटर वनक्षेत्र गमावले, तर केवळ १ चौरस किलोमीटरची वाढ झाली. हे प्रमाण अत्यंत चिंताजनक असून, ते भारतातील वन परिसंस्थेतील तीव्र विखंडनाचे संकट दर्शवते. जेव्हाकि भारत सरकारची मुख्य नोडल एजन्सी असलेल्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या मते, निव्वळ वार्षिक वनक्षेत्र वाढीच्या बाबतीत भारत जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. वनक्षेत्राच्या वार्षिक ऱ्हासाचा दर १०.७ दशलक्ष हेक्टर (१९९०-२०००) वरून ४.१२ दशलक्ष हेक्टर (२०१५-२०२५) पर्यंत घसरला आहे.

कीतीही वृक्षरोपणाच्या गोष्टी केल्या आपण, तरीही शेकडो, हजारो वर्ष जूनी घनदाट जंगले कापल्यावर ती त्याच तुलनेत पुन्हा मिळवणे सहज शक्य आहे? वन्य प्राणी आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, ते त्यांच्या नैसर्गिक अधिवासांचे जतन आणि संवर्धन करून निसर्गाचे खऱ्या अर्थाने रक्षण करतात. झाडे जंगलांना समृद्ध करतात आणि जंगले शुद्ध पाण्याच्या स्रोतांना समृद्ध करतात. भूजल पातळी सुधारते, शुद्ध ऑक्सिजन समृद्ध होते. तापमान नियंत्रित करण्यास मदत होते. जंगलांमध्ये वन्यजीव भरभराटीस येतात आणि प्राण्यांमधील अन्नसाखळी सुरळीतपणे कार्य करते. वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष कमी होतो. प्रदूषण कमी होते, ज्यामुळे मानवी आरोग्य सुधारते. ऋतूचक्र योग्यरित्या कार्य करते, पिके चांगली येतात आणि नैसर्गिक आपत्ती कमी होतात. रोगराई कमी होते, प्रत्येक नागरिकासाठी अन्नसुरक्षेचा पाया मजबूत करण्यास मदत मिळते. मानवी गरजा पुरेशा प्रमाणात पूर्ण होतात. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी करण्यास मदत मिळते. महागाई नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, देशात समृद्धी नांदते आणि मग देशाचा खऱ्या अर्थाने विकास होतो.

लेखक - डॉ. प्रितम भि. गेडाम
prit00786@gmail.com
 
Top