चार कोटी ६१ लाखांतून नळदुर्ग भुईकोट किल्ल्याचे जतन-संवर्धन; तटबंदीला नवा साज, मुन्सिफ कोर्टची पडवी सागवानी

नळदुर्ग, दि. २१ ऑगस्ट : शिवाजी नाईक

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी जतन-संवर्धनाच्या कामाला वेग आला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून राज्य पर्यटन विकास योजनेअंतर्गत तब्बल ४ कोटी ६१ लाख रुपयांच्या निधीतून पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून नळदुर्ग किल्ल्याच्या जतन व संवर्धनाचे काम गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे. ऐतिहासिक वास्तूची मूळ रचना आणि बांधकामशैली कायम ठेवत पारंपरिक पद्धतीने काम केले जात असल्याने किल्ल्याच्या वैभवात पुन्हा भर पडणार आहे.
किल्ल्याच्या पूर्व बाजूची ढासळलेली तटबंदी सध्या संवर्धनाच्या केंद्रस्थानी आहे. जीर्ण झालेले दगड काळजीपूर्वक काढून त्याऐवजी नवीन दगडांचा वापर करून तटबंदीला मजबूत करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, आधुनिक बांधकाम साहित्याचा वापर न करता पुरातत्त्व विभागाच्या नियमांनुसार पारंपरिक बांधकाम पद्धतीचा अवलंब केला जात आहे.

मुन्सिफ कोर्टला सागवानी पडवीचा नवा साज

किल्ल्यातील ऐतिहासिक मुन्सिफ कोर्टच्या दुरुस्तीचे कामही वेगाने सुरू आहे. जीर्ण झालेली जुनी पडवी काढून त्याच धर्तीवर सागवान लाकडाचा वापर करून आकर्षक नवीन पडवी उभारण्यात येत आहे. त्याचबरोबर बाह्य भिंतींचे पाईंटिंग, वॉटरप्रूफिंग आणि प्लास्टरचे कामही हाती घेण्यात आले आहे.

गुळपाणी-चुन्याच्या पारंपरिक मिश्रणाने संवर्धन

किल्ल्याच्या जतन-संवर्धनात आधुनिक सिमेंट-काँक्रीटला फाटा देत पारंपरिक बांधकाम तंत्राला प्राधान्य देण्यात आले आहे. वाळू, गुळपाणी, चुना, सुरक्षा व बेलपाणी आदींचे मिश्रण तयार करून त्याचा वापर तटबंदीच्या बांधकामासह पाईंटिंगच्या कामासाठी केला जात आहे. त्यामुळे किल्ल्याची ऐतिहासिक ओळख, वास्तुशैली आणि बांधकामाची वैशिष्ट्ये जपण्याचा प्रयत्न केला जात आहे.

राजस्थान, झारखंड, मध्यप्रदेशातील कारागिरांची कसब
या महत्त्वाकांक्षी संवर्धन प्रकल्पावर तब्बल ८५ कामगार व कुशल कारागीर कार्यरत आहेत. राजस्थान, झारखंड, मध्यप्रदेश यासह विविध राज्यांतील अनुभवी कारागिरांचा कामात सहभाग आहे. ऐतिहासिक वास्तूंच्या पारंपरिक बांधकामशैलीचा अनुभव असलेल्या या कारागिरांकडून दगडांची रचना, तटबंदी आणि लाकडी काम अत्यंत बारकाईने केले जात आहे.

दोन वर्षांत किल्ल्याचा कायापालट

नळदुर्ग किल्ल्याच्या जतन व संवर्धनाचे संपूर्ण काम तब्बल दोन वर्षे चालणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर किल्ल्याची तटबंदी, ऐतिहासिक वास्तू आणि परिसराला नवा साज चढणार असून नळदुर्गच्या ऐतिहासिक वैभवात पुन्हा भर पडणार आहे. त्यामुळे पर्यटक, इतिहासप्रेमी आणि अभ्यासकांसाठी हा किल्ला आणखी आकर्षणाचे केंद्र ठरण्याची शक्यता आहे.
 
Top