Wednesday, 12 September 2012

खेडयातला कुंभार झाला प्रख्यात गणेश मूर्तीकार


नळदुर्ग - कसलेही प्रशिक्षण घेतले नाही, ना रंग, ना ब्रश याचा कसलाही गंध नाही. अल्पशिक्षित असलेल्या व वडिलोपर्जीत पारंपारिक कुंभाराचा व्यवसाय असलेल्या दत्तात्रय संतराम कुंभार (गंधोरा, ता. तुळजापूर) यानी आपल्या कुटुंबियाच्या मदतीने जिद्द व चिकाटी आणि श्रद्धेपोटी पेणच्या (जि. रायगड) धर्तीवर श्री गणरायाची सुबक व कलात्मक मूर्तीकार म्हणून लौकिक प्राप्त केला आहे. कुंभार कुटुंबियानी तयार केलेली मूर्ती  राजस्थानमध्ये पोहचली, तर आजूबाजूच्या शहरात मूर्तीच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. हा कलाकार प्रसिद्धीच्या झोतापासून दूर असला तरी त्याच्या कलेमुळे त्याची ख्याती सर्वदूर पसरली आहे.

नळदुर्ग-तुळजापूर राज्य मार्गावर गंधोरा पाटीपासून दोन कि.मी.वर दत्तात्रय कुंभार यांचे गाव असून हे गाव ङ्खक्त दीड ते दोन हजार लोकसंख्येचे आहे. कुंभार हा मुर्तिकार या छोट्याशा गावात सुंदर अशा गणेशमुर्ती बनवत आहे. तसेच या बनवलेल्या गणेश मुर्ती विक्रीसाठी सोलापूरला स्टॉल उभे करुन विक्री करतात. त्याचबरोबर तुळजापूर, नळदुर्ग, लोहारा यासह उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावात विकतो. त्याने बनवलेल्या गणेशमुर्तीस मोठी मगणी असते. कुंभार यानी आपल्या घरात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमुर्ती बनविण्याचे साचे, गणेशाच्या विविध आकाराच्या असंख्य मुर्ती तयार केले आहे.
विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्याच्या स्वागतासाठी प्रत्येकाची जोरदार तयारी सुरु आहे. गणपतीच्या सुबक मुर्त्या, त्यांच्या नाविन्यपूर्ण मांडणीङ्कुळे इथल्या मुर्तींना सर्वत्र प्रचंड मागणी आहे. दत्तात्रय कुंभार यानी दहावीचे शिक्षण झाल्यावर घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने सन १९९० साली वडिलोपर्जीत पारंपारिक कुंभाराच्या व्यवसायास सुरुवात केली. त्यानी बिंदगी, माठ, डेरे, मडके, रांजण तयार करीत असे. त्यानंतर कुतूहल पोटी गणरायाची प्रारंभी शाडूची मूर्ती तयार केली. प्लॅस्टर ऑफ पॉरिसच्या मूर्ती तयार करताना सुबक व रेखीव आणि अत्यंत कलात्मक सुंदर मूर्ती बनविण्यात ते तरबेज झाले. तयार केलेल्या मुर्तींना दिवसेंदिवस अधिक मागणी होऊ लागली. ग्रामीण भागात तयार केल्या जाणा-या मूर्तीच्या निमित्ताने आज विविध कला पाहावयास मिळत आहे. मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने व गणपती उत्सव हा विशिष्ट कालावधीपुरता असल्याने उर्वरीत काळात ते आजही पारंपारिक कुंभाराचा व्यवसाय करीत असल्याचे सांगितले. त्यांच्या घरभर जिकडे पाहावे तिकडे श्री गणरायाच्या लहान मोठ्या विविध अवतारातील मुर्ती दृष्टीस पडल्या. त्याचबरोबर महिला, पुरुष, लहान मोठे कुंभार कुटुंबीय मुर्तींवर शेवटचा हात फिरवत असल्याचे मंगळवार रोजी भेट दिली असताना दिसून आले. यावर्षी मात्र मुर्तींच्या किंमतीत वाढ होणार असल्याची मसहिती दत्तात्रय कुंभार यांनी दिली. अवघ्या काही दिवसांवर घरोघर श्रीगणेशाचे मोठया थाटात आगमन होणार आहे, २२ वर्षापूर्वी दत्तात्रय कुंभार यानी गंधोरा (ता. तुळजापूर) या गावात शाडूच्या मातीच्या मुर्ती बनविण्यास सुरुवात केली. यावर्षी मुर्ती बनविणा-या साहित्याचे भाव दुप्पटीने वाढले असल्याची माहिती कुंभार यांनी दिली. कोल्हापूर, सोलापूर यासह इतर शहरातून मुर्ती बनविण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसची माती प्रत्येकी २५ किलो वजनाचे व १४० रुपये किंमतीचेे २०० पोते यावर्षी खरेदी केले आहे. गतवर्षी सुमारे दीड ते दोन लाखाची उलाढाल झाली आहे. मूर्ती बनविण्यासाठी वॉटर कलर, ऑइल पेंट याचा वापर करण्यात येतो, या कामी आई मुक्ताबाई संतराम कुंभार, भाऊ नागनाथ, पत्नी अनीता व मुले असे मिळून पाचजण सहकार्य करीत असल्याचे त्यानी सांगितले. यावर्षी पन्नास हजार रुपये गुंतवणूक केले असून खर्च वजा जाता निव्वळ ७५ हजार रुपये उत्पन्न मिळण्याची त्यांची अपेक्षा आहे. त्याचबरोबर साडे चार फूटाची मुर्ती तयार करण्यासाठी मजुरीसह दोन हजार रुपये खर्च येत आहे. यापूर्वीच परिसरातील काही गावे व शहरातील नामांकित २० ते २५ गणेश मंडळांनी मूर्ती बनविण्याचे त्यांना ऑर्डर दिले आहे. यंदाच्या वर्षी सहा फुट उंचीची सर्वाधिक उंच मुर्ती बनविल्याचे सांगून गणेश भक्तांनी यापेक्षाही अधिक उंचीची मूर्तीची ऑर्डर दिल्यास निश्‍चितच तयार करुन मिळेल, एवढेच नव्हे तर त्यानी चारशे पेक्षा अधिक गौरी गणपतीचे मुखवटे व १० इंचापासून ते ६ फुटापर्यंतचे गणपती मोठ्याप्रमाणावर तयार केले आहेत. दरवर्षी विविध प्रयोग करुन आकर्षक सजावट व रंगरंगोटी करुन गेणेशमुर्तीला आकर्षक करण्याचा त्यांचा हातखंडा आहे.
कुंभार यांनी यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज, महादेव, हनुमान रुपासह विविध आकाराच्या व डिझाइनच्या गणेशमुर्ती तयार केल्या आहेत. त्यानी मे महिन्यापासून मुर्ती तयार करण्यास सुरुवात केली असून मुर्तीवर शेवटचा हात फिरवून बाजारात विक्रीसाठी जय्यत तयारी करीत आहेत. प्रत्येक वर्षी अतिशय सुंदर व आकर्षक गणेशमुर्त्या तयार होत असल्याने गणपतीची मुर्ती राजस्थान प्रांतामध्ये गणेश भक्ताने घेवून गेल्याचे कुंभार यांनी बोलताना सांगितले.

Labels: