Saturday, 24 August 2013

डॉ. आंबेडकराच्या स्मारकाचे बांधकाम सुरु करण्याची मागणी

नळदुर्ग -: शासनाने घोषित केल्याप्रमाणे मुंबई दादर येथील इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारक बांधकामाला त्वरीत सुरुवात करावी, अशी मागणी रिपाइं तुळजापूर शाखेच्यावतीने तुळजापूर तहसिल कार्यालयासमोर निदर्शन आंदोलनाद्वारे करण्यात आली.
      रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, मराठा विभाग उपाध्यक्ष आनंद पांडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली तर तुळजापूर तालुकाध्यक्ष एस.के. गायकवाड, शहराध्यक्ष अरुण कदम, युवा आघाडीचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी कदम, युवा आघाडी तालुकाध्यक्ष अरुण लोखंडे आदींच्या नेतृत्वाखाली रिपाइंच्यावतीने विविध मागण्याकरीता तुळजापूर तहसिल कार्यालयासमोर तीव्र निदर्शन आंदोलन करण्यात आले.
         यावेळी तहसिलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामाला त्वरित सुरुवात करावी, तुळजापूर शहरात डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा बसवावा, रमाई  आवास इंदिरा आवास घरकुल योजना न.प. ने प्रभावीपणे राबवावी, नळदुर्ग येथील एकात्मिक घरकुल योजनेचे प्रलंबित काम त्वरित चालू करावे, तालुक्यातील चिचंखोरी तांडा ते मानमोडी रस्त्याचे डांबरीकरण करावे, कांदयाची दरवाढ कमी करावी, अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी मारेक-यांना फाशीची दयावी, आदीसह अन्य महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी रिपाइंचे कार्यकर्ते, नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

Labels: