Wednesday, 24 September 2014

केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी साधला संवाद

उस्मानाबाद - केंद्रीय निवडणूक निरीक्षक एम. नागेंद्र स्वामी आणि केंद्रीय खर्च निरीक्षक श्री. नेगी यांनी  चारही विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि माध्यम प्रमाणीकरण व माध्यम सनियंत्रण समिती सदस्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. निवडणूक विषयक खर्चाबाबत यंत्रणेने सतर्क राहण्याची गरज आहे तसेच पेड न्यूजबाबत स्थानिक व राज्य पातळीवरील वर्तमानपत्रांचे चांगल्या प्रकारे अवलोकन करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
   पेड न्यूज आणि माध्यम प्रमाणीकरणाबाबत त्यांनी काही सूचनाही समिती सदस्यांना केल्या. इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर देण्यात येणाऱ्या सर्व जाहिरातींचे प्रमाणीकरण आवश्यक आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी त्या प्रमाणित करुनच त्याचे प्रसारण करावे अशा सूचना त्यांनी केल्या. राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांनी जाहिरात प्रसारणाच्या संभाव्य दिनांकापूर्वी तीन दिवस अगोदर सदर जाहिरात प्रमाणीकरणासाठी देणे आवश्यक आहे. सदर जाहिरातीच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या दोन प्रती आणि त्यातील मजकूराच्या साक्षांकित केलेल्या दोन प्रती प्रमाणीकरणासाठी देणे आवश्यक आहे. समितीला या मजकुराचा कोणताही भाग थेट वगळण्याचा किंवा त्यात फेरबदल करण्याचा अधिकार असल्याचेही यावेळी स्वीप-2 आणि माध्यम प्रमाणीकरण निरीक्षक श्री. स्वामी यांनी सांगितले.
विविध वर्तमानपत्रांत एकाच पद्धतीचा आणि एकांगी मजकूर येत असेल तर तोही पेड न्यूजचाच प्रकार असल्याचे त्यांनी नमूद केले. उमेदवार अथवा राजकीय पक्षांकडून पोस्टर्स मोठ्या प्रमाणात छापली जातात. त्यावर मुद्रक आणि प्रकाशक यांची नावे आणि प्रतींची संख्या असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित उमेदवारांनी प्रिंटर्सकडे प्रतिज्ञापत्र भरुन देणे गरजेचे असून त्याची एक प्रत खर्च कक्षाकडे पाठविण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.                    

Labels: